
महेंद्र गायकवाडने सांगितले ‘राजकारण’
महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि वाद हे काही नवीन नाही. यंदा अहिल्यानगर येथे झालेली महाराष्ट्र केसरी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. चुकीचा निर्णय दिल्याचा आक्षेप घेत कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली होती.
त्यासह कुस्तीपटू पृथ्वीराज मोहोळ आणि कुस्तीपटू महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना झाला होता. पण, पंचाच्या निर्णयाला नाराज होऊन महेंद्र गायकवाड मधूनच कुस्तीचा फड सोडून बाहेर गेला होता. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी, तर गायकवाड हा उपमहाराष्ट्र केसरी झाला होता.
पण, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा एक भोंगळ कारभार समोर आला आहे. कुस्तीगीर संघाने उपविजेता महेंद्र गायकवाड याला बक्षीसच दिले नाही. राजकारण सुरू असल्याने आपल्याला बक्षीस मिळाले नाही, असा आरोप महेंद्र गायकवाड याने केला आहे.
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी आणि अजिंक्य पद स्पर्धेतील विजेत्याला थार आणि उपविजेत्याला बोलेरो गाडीचे बक्षीस आयोजकांकडून ठेवण्यात आले होते. या बक्षीस वितरणासाठी महेंद्र गायकवाड उपस्थित होता. पण, तो बक्षिसाविना परताला. यानंतर महेंद्र गायकवाडने संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या राजकारणामुळे आपल्याला बक्षीस मिळाले नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने एकत्र येऊन काम करावे. जेणेकरून पैलवानांचे नुकसान होणार नाही,” असे आवाहन महेंद्र गायकवाडने केले आहे.
अहिल्यानगरमध्ये काय घडले?
67 व्या महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना गुरूवारी (दि.13) स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्र केसरी किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यास थार जिपची चावी देण्यात आली. या बक्षीस वितरणासाठी महेंद्र गायकवाडही उपस्थित होता. मात्र, तो बक्षिसाविना परतला. अंतिम सामन्यात त्याने मैदान सोडल्याने भारतीय कुस्ती संघाच्या नियमानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने त्याला स्पर्धेतून बाद केले. विजयी मल्लांच्या यादीत त्याचे नावही नव्हते. त्यामुळे त्याला बक्षिसाविनाच परत माघारी फिरावे लागले.
नियमानुसार कुस्तीपटूला कुस्ती अर्धवट सोडून गेल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येते. त्यामुळे अंतिम लढतीमध्ये गायकवाड 16 सेकंदासाठी मैदान सोडून गेला. त्यामुळे संपूर्ण कुस्ती स्पर्धेतून बाद करण्यात आले. त्यामुळे उपमहाराष्ट्र केसरीचा किताब देता आला नाही,असे सांगण्यात येत आहे.