
‘Chhaava’ पाहिल्यानंतर भारताच्या माजी क्रिकेटपटूचा थेट सवाल; म्हणाला, अकबर एक महान…
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यागाचे वर्णन करणारा विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट संपूर्ण भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘Chhaava’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाई भोंसलेच्या भूमिकेत रश्मिका मंदाना , औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना हे दिसत आहेत. सिनेमा समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहून भारताच्या माजी फलंदाजाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे आणि त्यात त्यांचा व मुगल सम्राट औरंगजेब यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. विकी कौशलने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका सर्वांच्या पसंतीत उतरली आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ ने पहिल्या चार दिवसांतच ‘छावा’ ने १४५.४३ कोटींचा गल्ला कमावला आहे.
या चित्रपटामुळे मराठा इतिहासाबद्दल चर्चा सुरू झाली आहे, तर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही शाळेतील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये संभाजी महाराजांचा समावेश का केला गेला नाही असा प्रश्न विचारला आहे. त्याने ट्विट करून इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विशेषतः जेव्हा अकबर आणि औरंगजेब सारख्या शासकांबाबत मोठ्या प्रमाणात शिकवले गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले.
आकाश चोप्राने लिहिले की,’ आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची अविश्वसनीय कहाणी. शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल का शिकवले गेले नाही? कुठेही उल्लेख नाही, हा खरा प्रश्न आहे. अकबर एक महान आणि न्याय्य सम्राट कसा होता हे आम्हाला शिकवले गेले आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक अतिशय प्रसिद्ध रस्ता देखील आहे. हे का आणि कसे घडले ?
आकाशच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली . काहींनी त्यांच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले , तर काहींनी त्यांच्यावर राजकीय किंवा धार्मिक कथनात अडकल्याबद्दल टीका केली .