
उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; प्लान ठरला !
मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे.
अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील पदाधिकारीही उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. तसेच पक्षांतर्गत व्यवस्थापनावर ताशेरे ओढत संताप व्यक्त करत आहेत. असेच सुरू राहिले तर आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गटाला जड जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे, आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे सूतोवाच शिंदे गटातील एका नेत्याने केले आहे. पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठाकले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर
ठाकरेंच्या शिवसेनेत कोकणात झालेल्या डॅमेजनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत. कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. नवीन लोकांना सोबत घेऊन आपण काम करू. जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन आपल्याला विश्वास निर्माण करून संघटना उभी करायची आहे. उद्धव ठाकरे सगळ्यांशी संपर्क साधत आहेत. काही लोक सत्ता आमच्याकडे नसल्याने जात असतील. पण सत्तेच्या सोबत आहेत, त्यातीलही काही लोक आमच्यासोबत येतील. त्यानूसार आम्ही संघटना पुन्हा एकदा उभी करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचा बैठकांवर जोर
उद्धवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात चर्चा थांबविण्यासाठी असल्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. आता ते पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. सोमवारीही त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांना बोलावले होते. खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिवसेना भवनात २० रोजी खासदारांची आणि २५ रोजी आमदारांची बैठक होणार आहे.
दरम्यान, कोकणातील कुडाळ मतदारसंघातील उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभेतील पराभवानंतर ते पहिल्यांदाच ठाकरे यांच्या भेटीला आले होते. एसीबीच्या माध्यमातून मला त्रास दिला जात आहे. मात्र, ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करण्यावर भर देऊ, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.