इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी येथील लिटिल ब्लॉसम स्कुल या खासगी शाळेच्या मैदानात पहिलीतील विद्यार्थ्यावर चारचाकी वाहन चढविल्याची धक्कादायक घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संबंधित शिक्षक, मुख्याध्यापिका, त्यांच्या पतीसह शाळा व्यवस्थापन समितीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी कुंडलिक काळू डावखर (रा. गिरणारे, ता. इगतपुरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा हर्ष कुंडलिक डावखर हा इयत्ता पहिलीमध्ये लिटिल ब्लॉसम स्कुल येथे शिक्षण घेत आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेच्या मैदानात खेळत असताना पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. हे वाहन शाळेशी संलग्न असलेले शिक्षक यश कदम चालवत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अपघातानंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
मुख्याध्यापिकेसह तिघांवर गुन्हा
या प्रकरणी शिक्षक यश कदम, मुख्याध्यापिका श्रीमती मंत्री, त्यांचे पती पप्पू मंत्री तसेच शाळा व्यवस्थापन समितीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर सुरुवातीला शाळा प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याचा आरोप फिर्यादींकडून करण्यात आला आहे.
तसेच, शाळेच्या सुरक्षितता नियमावलीचे (एस.ओ.पी.) पालन करण्यात आले नसून, पोलिसांत तक्रार दिल्यास मुलाच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल, अशी भीती दाखवून दमदाटी केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादींनी केला आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाळेच्या मैदानात वाहनांची ये-जा कोणत्या नियमांनुसार होते, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
जखमी विद्यार्थ्याला न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
