
आरबीआयची मान्यता नसलेल्या परदेशी बँकेची बँक गँरेटी कशी ? हायकोर्टात याचिका दाखल…
राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पात घोटाळा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका पत्रकारानं दाखल केलेल्या याचिकेत जेष्ठ वकील प्रशांत भूषण मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणार असून आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
या प्रकल्पाचे काम मिळालेल्या मेघा इंजिनिअरींग या खासगी कंपनीकडून एमएमआरडीएला 16 हजार 600 कोटींची बँक गँरंटी देण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त नसलेल्या परदेशी बँकेकडून दिलेली बँक गँरंटी कायदेशीर कशी
युरोपमधील सेंट लुशिया स्थित ‘युरो एक्झिम बँक’ या आरबीआयकडून मान्यता प्राप्त नसलेल्या परदेशी बँकेकडून दिलेली बँक गँरंटी कायदेशीर कशी? असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे याशिवाय या कंपीनचं नाव इलेक्टोरल बाँड घोटाळ्यात सर्वाधिक निधी देणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. त्यामुळे यात राजकारण्यांचे लागेबांधे असल्याचाही याचिकेतून आरोप करण्यात आला आहे.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्या प्रकल्पाला 35.5644 हेक्टर वनक्षेत्र
दरम्यान, घोडबंदर रोडवरील वाहतूक कमी करणाऱ्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्या प्रकल्पाला 35.5644 हेक्टर वनक्षेत्र मिळाले आहे. ठाणे ते मुंबई उपनगरातील अंतर कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी 35.5644 हेक्टर वनक्षेत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सुपूर्द करण्यात आले आहे. ठाण्याच्या दिशेने सात गावे आणि बोरिवलीच्या दिशेने एका गावाच्या जमिनीचा यात समावेश आहे. एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, ही जमीन मानपाडा, माजिवडा, बोरीवडे, येऊर आणि चेणे गावांच्या ठाणे दिशेकडे आहे.
त्याचवेळी बोरिवलीच्या दिशा येथून मागाठाणे गावातील जमिनीवर प्रकल्पासाठी बांधकाम करण्यास परवानगी मिळाली आहे. ट्विन बोगदा प्रकल्पांतर्गत 1.85 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. एमएमआरच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण 14,401 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 1,144.60 कोटी रुपये राज्य सरकार, 572.30 कोटी रुपये केंद्र सरकार आणि 700 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च करायचे आहेत.
प्रकल्प काय आहे?
ट्विन बोगदा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत जाणार आहे. यासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून प्रत्येकी 3 लेनचे दोन बोगदे तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. बोगद्याद्वारे पश्चिम द्रुतगती महामार्ग थेट ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडला जाऊ शकतो. बोगदा बांधण्याचे काम तीन टप्प्यात विभागण्यात आले आहे. पॅकेज-1 मध्ये बोरिवली ते ठाणे दरम्यान सुमारे 5.75 किमी लांबीचा बोगदा असेल आणि पॅकेज-2 मध्ये ठाणे ते बोरिवली दरम्यान सुमारे 6.5 किमी लांबीचा बोगदा असेल. पॅकेज-3 मध्ये मार्गावर व्हेंटिलेशन यंत्रणा आणि इतर उपकरणे बसवण्याचे काम केले जाईल. एमएमआरडीएने हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.