
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रेम सावंत
परभणी: शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मॉडल उर्दू हायस्कूल, परभणी येथील मुख्याध्यापिका आणि लिपिक यांना १८,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे.
तक्रारदार हे शाळेत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांचे एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित होते. हे वेतन मिळाल्यानंतर, मुख्याध्यापिका श्रीमती सिद्दिकी अहेमदी (वय ५७) आणि लिपिक बुढन खान पठाण (वय ५३) यांनी वेतनातून प्रत्येक महिन्यासाठी ३,००० रुपये असे एकूण १८,००० रुपयांची लाच मागितली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून १८ मार्च २०२५ रोजी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष सिद्ध केले. त्यानंतर, १९ मार्च २०२५ रोजी ACB ने सापळा रचून तक्रारदाराकडून १८,००० रुपये स्वीकारताना लिपिक बुढन खान पठाण यांना रंगेहात पकडले. ही रक्कम मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांच्या सांगण्यावरून घेतली जात असल्याचेही समोर आले.
तपासाच्या पुढील टप्प्यात मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता, तब्बल ९,५०,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.याशिवाय, आरोपींच्या अंगझडतीत मोबाईल फोन आणि अतिरिक्त रोकड जप्त करण्यात आली.
या प्रकरणी परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या मोबाईल फोनमधील माहितीची तपासणी केली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तत्काळ तक्रार द्यावी. अशी भ्रष्टाचारविरोधी कारवाई पुढेही सुरूच राहील.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी