
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-
डहाणू तालुक्यातील सरावली सावटा हात येथील रहिवासी असलेल्या आनंद रामाशंकर ठाकूर या परप्रांतीय व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आदिवासी वारली जमातीचा खोटा जातीचा दाखला मिळविल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या पालघर जिल्हा सचिवांनी तक्रार देऊन पाठपुरावा केल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. दरम्यान, संयुक्त आदिवासी संरक्षण समिती अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांसमोर या प्रकाराला जोरदार विरोध दर्शवून आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर तहसीलदार डहाणू यांनी डहाणू पोलीस ठाण्यात पत्र पाठविल्यानंतर आनंद ठाकूर व किरण डोंगरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव अरुण धोडी यांनी दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयाकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. या पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने चौकशी सुरु केली असता आनंद ठाकूर हे मूळचे हिंदू-राजपूत असून, परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शासनाची दिशाभूल करत खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासी वारली या अनुसूचित जमातीचा दाखला मिळवला आहे.
या प्रकरणी तहसील कार्यालय, डहाणू येथे दिनांक ६ मार्च २०२५ रोजी सुनावणी घेण्यात आली. यावेळी शासकीय आश्रमशाळा बापूगावचे मुख्याध्यापक, सरावलीचे तलाठी, डहाणूचे सेतू चालक तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव उपस्थित होते. या सुनावणी दरम्यान आनंद ठाकूर यांनी त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९८८ रोजी उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे झाल्याचे सांगितले. त्यांच्या वडिलांचे नाव रामाशंकर लालजी ठाकूर व आईचे नाव रेखा रामाशंकर ठाकूर असे आहे. त्यांनी १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा आशागड येथे तर पुढील शिक्षण के. के. मेस्त्री हायस्कूल, सरावली येथे घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच आनंद ठाकूर यांनी व त्यांच्या पत्नीने ठाकूर हे आडनाव ठाकरे असे राजपत्राद्वारे बदलल्याचे सांगितले. त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव अनिता गणपत सापटा असून त्या आदिवासी वारली जमातीतील असल्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आनंद ठाकूर यांनी खोटी कागदपत्रे तयार केली. त्यांनी अस्तित्वात नसलेल्या शासकीय आश्रमशाळा, बापूगाव या नावाने शाळा सोडल्याचा बनावट दाखला मिळवून घेतला असून, त्यात जातीचा उल्लेख हिंदू-वारली असा आहे. हा दाखला आशागड येथील किरण डोंगरकर यांच्याकडून मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू यांच्याकडून दिनांक १३ जून २०२४ रोजी हिंदू-वारली जातीचा दाखला मिळविला. मात्र, चौकशी आणि सुनावणी दरम्यान त्यांनी ही बाब खोटी असल्याचे स्वतः मान्य केले आहे. त्यांनी खोटी वंशावळ तयार करून, बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी मंडळ अधिकारी गौरव बांगारा यांच्या मार्फत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आनंद ठाकूर व किरण डोंगरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या फौजदारी कायद्यानुसार या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.