
सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला उधाण…
मुंबई: धनंजय मुंडे यांच्या सोशल मीडियातील एका पोस्टमुळे त्यांनी खरोखर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे का, आणि राज्यपालांनी तो मंजूर केला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या एक्स अकाऊंटवरुन आज एक पोस्ट करण्यात आली आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा उल्लेख मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य असा करण्यात आला आहे.
त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरोखर झाला आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला देण्यात आली नव्हती, त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. तर त्यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला की आरोग्याच्या कारणामुळे यावरुनही खल सुरु होता. त्यात आता त्यांनी त्यांच्या नावापुढे ‘मंत्री’ असा उल्लेख केल्यामुळे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरंच झाला आहे का? अशी चर्चा होत आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्यसूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अखेर संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च रोजी सुरु झाले. त्याच दिवशी काळजाचा थरकाप उडवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात झाला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. अजित पवारांनीही राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मात्र विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना सभागृहाला राजीनाम्याची माहिती दिली नाही, त्यामुळे खरोखर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का? आणि सरकारने तो स्वीकारला का, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडूनच राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह लावणारी पोस्ट समोर आली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते अधिवेशनाकडे फिरकले देखील नाही. आजारपणाचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेच्या कायम संपर्कात आहेत. जयंती, मयंती किंवा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे वाढदिवस, मुख्यमंत्र्यांचे ट्विट रिट्विट करुन त्यांचे अभिनंदन, शुभेच्छा या माध्यमातून ते सक्रिय आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाला 98 वर्षे होत आहेत. सामाजिक सबलीकरण दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी फोटो पोस्ट परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यामध्ये धनंजय मुंड़े मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा खरोखर राजीनामा झाला आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
सामाजिक समतेच्या दृष्टीकोनातून सर्वांना समान सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी अर्थात २० मार्च १९२७ रोजी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह पुकारला. या क्रांतिकारी लढ्यात सामील झालेल्या सर्व सत्याग्रहींच्या स्मृतींना…