
मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं सीआयडीने स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
परंतु हा राजीनामा घेण्यास उशीर केला का, असा प्रश्न उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं जात आहे. तसंच या प्रकरणात मुंडे यांच्याभोवतीही संशयाचं धुकं निर्माण झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडत पुरावा दिल्यास धनंजय मुंडे यांच्यावर आजही कारवाई करायला तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने कोर्टात जी चार्जशीट सादर केली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट कुठेही संबंध आढळलेला नाही. पण तपास यंत्रणांनी वाल्मीक कराड याला या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी केलं आहे. हा वाल्मीक कराड धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं राजकारण सांभाळत होता. मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती इतकं क्रूर कृत्य करत असेल तर तर त्या मंत्र्याने प्रायश्चित्त म्हणून आपलं पद सोडावं, अशी आमची भूमिका होती. त्यामुळे आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला,” असं फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
दरम्यान,या हत्येत धनंजय मुंडे यांचा कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. फक्त कोणीतरी दररोज टीव्हीवर येऊन आरोप केले म्हणून कोणाचं नाव चार्जशीटमध्ये घेता येत नाही. आजही पुरावा आणून दिल्यास धनंजय मुंडे यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असा शब्दही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.