
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार २२ मार्च रोजी सकाळी ११ ते २ वाजता दरम्यान डहाणू तालुका जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी कमी वेळ आणि योग्य प्रमाणात जाहिरात झाली नसल्यामुळे कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले.
पालघर जिल्ह्यात पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथे २० फेब्रुवारी रोजी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे पालकमंत्री यांनी पालघर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुका स्तरावर जनता दरबार घेण्याची गरज व्यक्त केली होती. सध्या मुख्यमंत्र्यांच्या “शंभर दिवस कार्यक्रम” अंतर्गत जिल्ह्यात तालुका स्तरावर जनता दरबार घेण्याचे सुरू असून शनिवारी डहाणू तालुका जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या जनता दरबाराची योग्य प्रमाणात प्रसिद्धी न झाल्यामुळे जनता दरबाराला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले.
डहाणू येथे आयोजित कार्यक्रमात एकूण ४० तक्रारी नोंदवण्यात आल्या. नागरिकांच्या समस्यांवर १५ दिवसात तोडगा काढण्याच्या सूचना खासदार सवरा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार राजेंद्र गावित यांनी डहाणू तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामावर प्रकाशझोत टाकत कामांच्या दर्जाविषयी नाराजी व्यक्त केली. नुकतीच डहाणू तालुक्यातील चळणी येथे घडलेल्या घटनेचा उजाळा देत त्यांनी निकृष्ट कामांबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच तालुक्यात एकूण कामांपैकी मात्र ३५ टक्के कामे पूर्ण झाली असून त्यांच्याही दर्जाबाबत संशय व्यक्त केला.
एकीकडे पालघर येथील जनता दरबारात ७४१ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून तालुका स्तरावर मात्र ४० तक्रारी आल्यामुळे कार्यक्रमासाठी कमी वेळ आणि तोकड्या प्रसिद्धीमुळे कार्यक्रमाला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. यापुढे असे कार्यक्रम करताना व्यापक प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.