
मुंबई : अजित पवार गटाचे अण्णा आमदार बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी विधानसभेत याबाबत औपचारिक घोषणा होऊन बनसोडे हे उपाध्यक्षपद स्वीकारतील. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. मंगळवारी पडताळणीत हा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २६) उपाध्यक्षपदी बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून सभागृहात केली जाईल.
बनसोडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत. बनसोडे २००९ साली पहिल्यांदा आमदार झाले, मात्र २०१४च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे २०१९च्या निवडणुकीत ते विजयी झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली. बनसोडे यांची पिंपरीत पानटपरी होती. पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे.