
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणूतील कृषी विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर बटाट्याची यशस्वी लागवड करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. वाणगावच्या कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथील विद्यार्थ्यांनी हा प्रयोग राबवला असून, डहाणूच्या जमिनीत बटाट्याचे पीक चांगल्या प्रकारे वाढू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
बटाटा हे थंड हवामानात चांगले उत्पादन देणारे पीक असून, त्याच्या वाढीसाठी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात बटाट्याची लागवड केली, त्यामुळे डिसेंबर-जानेवारीच्या थंड हवामानाचा फायदा मिळून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. विद्यार्थ्यांनी गादीवाफा पद्धतीने ३०x२० सेमी अंतर ठेवून बटाट्याची लागवड केली. लागवडीपूर्वी बेण्यांचे स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट आणि टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड मिश्रणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच, योग्य खत व्यवस्थापन केल्यामुळे पीक जोमाने वाढले. विद्यार्थ्यांनी जमिनीत हेक्टरी १५-२० टन शेणखत मिसळून जमीन तयार केली. तसेच, नत्र (१५० किलो), स्फुरद (६० किलो) आणि पालाश (१२० किलो) खतांची शिफारस करण्यात आली. झिंक सल्फेट २० किलो प्रति हेक्टर प्रमाणे वापरण्यात आले, त्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रयोगातून या भागात ८०-९० दिवसांत बटाटे काढणीस तयार होतात, हे स्पष्ट झाले. यासाठी उच्च उत्पादन देणाऱ्या योग्य बटाट्याच्या वाणांची निवड करण्यात आली.सध्या बाजारात बटाट्याचा दर ३०-४० रुपये प्रति किलो आहे, तर बियाण्यांचा दर ४०-५० रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे कमी कालावधीत उच्च उत्पादन देणारे बटाट्याचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा, असा सल्ला शेतीमित्र पुरस्कार विजेते मिलिंद पाटील यांनी दिला. त्यांनी सांगितले की, बटाटा कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारे पीक असून, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात याकडे वळल्यास आर्थिक बळकटी मिळू शकते.
या यशस्वी प्रयोगामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. रब्बी हंगामात बटाटा उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळू शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे जिल्ह्यात बटाट्याची शेती मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रयोगातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बटाटा लागवड हा फायदेशीर पर्याय ठरू शकतो. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा.
– सोनालिका पाटील – प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
आधुनिक शेतीचे शिक्षण घेतल्यामुळे आमचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही नोकरीऐवजी शेतीकडे वळण्याचा विचार करत आहोत. भविष्यात शेतकऱ्यांना बटाटा लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
– अस्मिता बुजड – विद्यार्थिनी, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव