
आईने दुसऱ्यांच्या घरातील टीव्हीवर पाहिला लेकाचा विजय…
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्यावतीने अहिल्यानगरमध्ये 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये वेताळ शेळके विरुद्ध पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. या लढतीत सोलापूरच्या वेताळ शेळकेने पृथ्वीराजचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं आहे.
माढा तालुक्यातील बेंबळे गावचा वेताळ शेळके यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला अन् माढा तालुक्यात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. वेताळची कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच. वेताळच्या घरात टीव्ही नाही. त्यामुळे लेकाची लढत पाहण्यासाठी वेताळच्या आईने घरात टीव्ही नसल्याने शेजारच्या घरात जाऊन आपल्या मुलाचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पाहिला. यावेळी मुलाचे यश बघून वेताळची आई केसरबाई शेळके भावुक झाल्या.
माढा तालुक्यातील बेंबळे गावात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला वेताळ औदुंबर शेळके याचे संपूर्ण कुटुंब दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करतात. वेताळ याने पुणे येथील काकासाहेब पवार कुस्ती अकादमीतून कुस्तीचे धडे गिरवले. यापूर्वी आपले वडील, चुलते आणि आजोबा यांच्याकडूनच कुस्तीचे प्राथमिक धडे त्याने बेंबळे या गावातच गिरवले. वेताळने खेलो इंडिया या स्पर्धेत कुस्तीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने लहानपणापासून बरीच मेहनत घेतली. अखेर त्याच्या मेहनतीला यश आलं आहे. आता तर वेताळने महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं आहे. शेतमजुराचा पैलवान झालेला पोरगा असा एक नवा आदर्श वेताळ शेळके याने निर्माण केला आहे.