
पहिल्या दिवशी केली फक्त ‘इतकी’ कमाई…
सलमान खान व रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ए.आर.मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही.
सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचं कोणी भरभरून कौतुक करत आहे, तर कोणी ट्रोल करत आहे. सलमान, रश्मिकाच्या अभिनयासह कथानक अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही. पण, ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या.
सलमान खानचे चाहते ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. धमाकेदार टीझर, ट्रेलर गाण्यांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारण गेल्यावर्षी सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता. ‘सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन’ या चित्रपटांमध्ये फक्त त्याचा कॅमिओ पाहायला मिळाला होता, त्यामुळे ‘सिकंदर’ चित्रपटाचं प्रदर्शन भाईजानच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. पण, पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिवर जादू फिकी पडल्याचं दिसत आहे.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, सलमानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी २६ कोटींचा व्यवसाय केला आहे. सकाळी ‘सिकंदर’ची सुरुवात संथ गतीने झाली. सकाळच्या शोमध्ये १३.७६ टक्के ऑक्युपन्सी होती. त्यानंतर संध्याकाळच्या शोमध्ये ऑक्युपन्सी वाढली आणि रात्री पुन्हा ऑक्युपन्सी घटली.
सलमानचे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई
‘सिकंदर’ चित्रपटाआधी २०१९मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. ४२.३० कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता. २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३६.५४ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. तसंच याआधी कतरिना कैफ, सलमान खानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाने ३२.९३ कोटींचं कलेक्शन केलं होतं.
सलमानच्या तीन फ्लॉप चित्रपटांनी पहिल्या दिवशी केलेली चांगली कमाई
२०१८मध्ये फ्लॉप झालेला सलमान खानच्या ‘रेस ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने २९.१७ कोटींचा गल्ला जमवला होता. तसंच २०१५ मधील ‘बजरंगी भाईजान’ने २७.२५ कोटी, ‘किक’ने २६.४० कोटी, ‘बॉडीगार्ड’ने २१.६० कोटी कलेक्शन केलं होतं. सलमानच्या फ्लॉप चित्रपटाच्या यादीतील ‘ट्यूबलाइट’ व ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने अनुक्रमे २१.१५ कोटी आणि १५.८१ कोटींची कमाई केली होती.
दरम्यान, ‘सिकंदर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सलमान खानने चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली होती. सलमान खान म्हणाला होता की, चित्रपट चांगला असो वा वाईट, चाहते १०० कोटी पार करून टाकतात. पण, १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात.