
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी – अविनाश देवकते
रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना असून, या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात आणि नमाज अदा करतात. या काळात मुस्लिम समाज विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी प्रार्थना करतो. रमजान ईदच्या निमित्ताने माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सलोख्याचा संदेश दिला.
ईदगाह मैदानावर आयोजित ‘ईद-उल-फित्र’ कार्यक्रमात आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी बंधुभाव जोपासावा आणि समाजात एकता टिकवावी. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव नमाज अदा करून अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, हे अत्यंत प्रशंसनीय आहे.”
यावेळी इदगाह येथे सय्यद मुस्ताक अहमद खतीब यांनी नमाज अदा केली आणि मुफ्ती हम्माद कुरैशी यांनी धार्मिक मार्गदर्शन केले. या प्रसंगी इदगाह कमेटीचे सय्यद मुजीब अहमद खतीब, समद बागवान, साबेर पटेल, सय्यद खमर इस्लाम, सय्यद एजाज खतीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, भरत चामले, समीर शेख, वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, अनिल मुदाळे, श्याम डावळे, श्रीरंग कांबळे, फय्याज शेख, नवनाथ गायकवाड, सनाउल्ला खान, बाळासाहेब मारलापल्ले, शफी हाशमी, शशिकांत बनसोडे, गिरीश उप्परबावडे आदी मान्यवरही उपस्थित होते.
माजी मंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या कार्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “उदगीर मतदारसंघात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. मस्जिद परिसराचे सुशोभिकरण, संरक्षण भिंतींचे बांधकाम, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
पुढे ते म्हणाले, “माझ्या राजकीय वाटचालीत मुस्लिम समाजाने मला खूप साथ दिली असून, मी सदैव या समाजाच्या पाठीशी उभा राहणार आहे. आगामी काळात मुस्लिम समाजाच्या हितासाठी अधिकाधिक प्रकल्प राबवले जातील.”
या कार्यक्रमाला हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदगाह मैदान नमाजासाठी सज्ज झाले होते आणि सर्वत्र मांगल्याचा वातावरण होता. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या आणि आनंद साजरा केला.
ईदच्या शुभ प्रसंगी संजय बनसोडे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत, सामाजिक एकता व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.