
शिवसेना भवनासमोर लावला भलामोठ्ठा बॅनर, म्हणाले…
विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरे यांच्या पराभवाला हातभार लावणारे शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांच्या मुलाने राज ठाकरे यांना डिवचले आहे.
समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर एक भलामोठ्ठा फलक लावला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरे यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली होती. याच मुद्द्यावरुन सदा सरवणकरांच्या पुत्राने राज ठाकरे यांना डिवचले आहे. ‘गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय?’, असा मजकूर समाधान सरवणकर यांनी लावलेल्या फलकावर लिहला आहे.
या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांची कुंभमेळ्यातील छायाचित्रे लावण्यात आली आहेत. 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभ सोहळ्यात जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करुन अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण अभिमानाचा आणि गौरवाचा होता. हा क्षण हिंदुंच्या एकजुटीचा होता, असा मजकूर या फलकावर लिहला होता. तसेच गंगाजल शुद्धच आहे, पण काही लोकांच्या विचारांचं काय, असा सवाल विचारत समाधान सरवणकर यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. या माध्यमातून शिंदे गटाने एकीकडे राज ठाकरे यांना लक्ष्य करताना दुसरीकडे कडवट हिंदुत्त्वाचा पुरस्कारही केला आहे.
शिंदे गटाचा हा बॅनर शिवसेना भवनासमोर म्हणजे राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावरच लावण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. दादरचा परिसर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष असलेल्या संदीप देशपांडे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आता संदीप देशपांडे हे समाधान सरवणकर आणि शिंदे गटाला ‘जशास तसे प्रत्युत्तर’ देणार का, हे बघावे लागेल.
राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात काय म्हणाले ?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात एक किस्सा सांगितला होता. बाळा नांदगावकर कुंभमेळ्यातून येताना माझ्यासाठी गंगाजल घेऊन आले होते. मात्र, पण ते पाणी मी प्यायलो नाही. त्यावेळी मग नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला म्हणाले की कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची अवस्था भीषण झाली आहे. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी लोक गेले होते. या लोकांची विष्ठा नदीच्या पाण्यात मिसळली असेल. मग ते पाणी शुद्ध कसं असू शकतं, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
कुंभमेळ्यात अंघोळ केल्यावर लाखो लोक आजारी पडले आहेत. हे मला उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच सांगितलं. गंगेवरची काय परिस्थिती आहे? कुंभमेळ्याच्या अपमानाचा प्रश्न नाही. प्रश्न पाण्याचा आहे. पण आपल्या नैसर्गिक गोष्टींवर अशाप्रकारचा धर्म आढवा येत असेल तर, या धर्माचं काय करायचं. आपल्या गोष्टीत आपण बदल करायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.