
म्हणाली दावा करण्यापूर्वी आधी…
अभिनेत्री दिया मिर्झाने हैदराबादमधील कांचा गचीबोवली इथल्या जंगलतोडीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी एआय- जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ वापरल्याचा आरोप नुकताच करण्यात आला होता.
या आरोपांवर आता दिया मिर्झाने मौन सोडलं असून तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचसोबत दियाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी तिने रविवारी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. एआय-जनरेटेड फोटो पोस्ट केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना दियाने तेलंगणा सरकारला असे दावे करण्यापूर्वी तथ्ये पडताळण्याचं आवाहन केलं आहे.
दिया मिर्झाची पोस्ट-
‘तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यांनी कांचा गचीबोवली इथल्या परिस्थितीबद्दल काही दावे केले होते. त्यापैकी एक दावा असा होता की मी सरकारने लिलाव करू इच्छित असलेल्या 400 एकर जमिनीवर जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ बनावट एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ वापरल्या होत्या. हे पूर्णपणे खोटं विधान आहे. मी एकही एआय जनरेटेड फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केलेला नाही. असे दावे करण्यापूर्वी मीडिया आणि तेलंगणा सरकारने त्यांच्या तथ्यांची पडताळणी करावी’, असं तिने स्पष्ट केलंय.
विद्यापीठाच्या सीमेवरील 400 एकर जमिनीचा विकास करण्याच्या राज्य सरकारच्या योजनेविरुद्ध हैदराबाद विद्यापीठातील अनेक विद्यार्थी निदर्शनं करत आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि आयटी पार्कच्या बांधकामासाठी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या जमिनीचा लिलाव करण्याच्या तेलंगणा सरकारच्या योजनेला हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेनं विरोध केला आहे. सध्या हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये कांचा गचीबोवली जमीन प्रकरणावर मोर आणि हरीण दाखवणाऱ्या एआयद्वारे तयार केलेल्या कंटेंटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. बैठकीदरम्यान, अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितलं की अनेक सेलिब्रिटी एआय-जनरेटेड व्हिडीओंना बळी पडून त्यासंदर्भात सोशल मीडियावर विरोध करत आहेत. त्यामुळे हा विषय इतका गाजतोय. यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांना राज्यातील सायबर गुन्हे विभाग अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.