
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या नळगीर तांड्याला अखेर नवसंजीवनी मिळाली आहे. तहसीलदार राम बोरगावकर यांनी प्रत्यक्ष तांड्यावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि विकासाची नवी दिशा ठरवली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणताही वरिष्ठ अधिकारी या तांड्यावर पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विशेषतः मुलींमध्ये या भेटीचा विशेष प्रभाव दिसून आला.
रस्ता नसल्यामुळे शिक्षणात अडथळे
नळगीर तांड्यापर्यंत जाण्यासाठी आजही केवळ कच्चा रस्ता आहे, जो ना नकाशावर आहे ना अधिकृत दर्जा प्राप्त. परिणामी, पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो आणि विद्यार्थिनींना शाळेत पोहोचणे कठीण जाते. आठवी, नववी, दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी तहसीलदारांसमोर आपले अनुभव मांडले – अनेक वेळा पाऊस आणि एकटी असण्यामुळे त्यांना शाळा गाठता येत नाही आणि त्यामुळे अभ्यासात खंड पडतो, शाळा सोडण्याचा विचार करावा लागतो.
तहसीलदारांनी घेतली गंभीर दखल
विद्यार्थिनींच्या मनातील वेदना ऐकून तहसीलदार राम बोरगावकर यांनी तातडीने हालचाल केली. त्यांनी रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून रस्त्याच्या बांधकामासंबंधी कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या वतीने लवकरच आवश्यक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घोषणा होताच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
संविधान प्रतीची अनोखी भेट
विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी तहसीलदार बोरगावकर यांनी त्यांना भारतीय संविधानाच्या प्रती भेट दिल्या. ही प्रती त्यांच्यासाठी केवळ एक पुस्तक नव्हते, तर एक प्रेरणा होती. संविधान हातात घेताच त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. अधिकारी होण्याची प्रेरणा आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद त्यांच्या डोळ्यांत दिसून आली.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकारी तांड्यावर
ग्रामस्थांनी अभिमानाने नमूद केले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणताही अधिकारी त्यांच्या तांड्यावर आला आहे. तहसीलदार राम बोरगावकर यांची कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि तत्परता पाहून ग्रामस्थांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. विद्यार्थिनींनी देखील आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “अधिकारी आमच्या गावी आले, आमच्या अडचणी ऐकल्या, यानेच आमचा आत्मविश्वास वाढला आहे.”
तहसीलदार बोरगावकर यांच्या या भेटीने नळगीर तांड्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. एकीकडे प्रशासकीय पातळीवर रस्ता उभारणीसाठी पावले उचलली जात आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थिनींमध्ये शिकण्याची जिद्द आणि अधिकारी होण्याची प्रेरणा जागी झाली आहे. ही भेट तांड्याच्या भविष्यासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे.
_________________________________
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकारी तांड्यावर – ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
_________________________________