
महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला दणका…
पुणे महापालिकेचा मिळकत कर थकवणे दीनानाथ रुग्णालयाला महागात पडणार आहे. रुगालय धर्मादाय असल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासन कोर्टात गेले आहे. असे असले तरी, पालिकेचा कर थकवल्याप्रकरणी मिळकत कर विभाग रुग्णालयाला कर भरण्यासाठी नोटीस धाडणार आहे.
रुग्णालयाचा एकूण थकबाकीचा हिशोब केला असता रुग्णालयाने तब्ब्ल 22 कोटी रुपये थकवल्याचे पुढे आले आहे. या बाबत आज मंगळवारी (दि.8) दवाखान्याला नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिली.
मंगेशकर रुग्णालयाकडे पालिकेच्या मिळकत कराची तब्बल 27 कोटीची थकबाकी असल्याचे समोर आल्याने पालिका प्रशासनावर मोठी टीका झाली. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने जर कर थकवला तर त्याच्या घरासमोर बँड वाजवला जातो.
मात्र, महापालिका मंगेशकर रुग्णालयावर एवढी का मेहरबान आहे, असा सवाल पुणेकरांनी विचारल्यावर पालिकेच्या मिळकत कर विभागाला जाग आली आहे. महापालिकेने रुग्णालयाच्या मिळकत कर थकबाकीचा हिशोब केला असून रुग्णालयाकडे सध्या 22 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. ही थकीत रक्कम भरण्यासाठी मंगळवारी (दि 8) रुग्णालयाला नोटीस बजावली जाणार आहे.
दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय असून त्यामुळे दवाखान्याचा मिळकत कर माफ करावा अशी मागणी करत दवाखान्याने या प्रकरणी न्यायालयात केस दाखल केली आहे. 2017 पासून ही केस न्यायप्राविष्ठ आहे. ही रक्कम त्यांना भरावीच लागेल, असे प्रशासनाने सांगितले.
रुग्णालयाकडे 22 कोटी रुपयांची थकबाकी
महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून रुग्णालयाने मागील सहा वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपये इतका मिळकतकर थकवल्याचे समोर आले होते. दवाखान्याची आतापर्यंत 15 कोटी रुपये भरले आहेत. मात्र, 2019-20 ते 2024-25 या आर्थिक वर्षांत रुग्णालायकडून मिळकतकराची रक्कम भरली नाही. त्यामुळे रुग्णालयाकडे 22 कोटी रुपयांची थकबाकी आहे.