
मनसे उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक; काय आहे प्रकरण…
मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर मनसेने, ‘भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल’, असा इशारा दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे.
मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत. गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बँकामध्ये मराठी भाषा बोलली जाते की नाही, ते तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आणि या वादाला सुरुवात झाली. मनसेच्या आंदोलनामुळे उत्तर भारतीयांविरोधात द्वेष पसरवण्याचे काम होत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय सेनेने केली आहे. उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे हे केवळ उत्तर भारतीयांचेच विरोधक नाहीत तर मराठी माणसाचेही विरोधक आहेत. तुम्ही उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली आहे. तुम्ही थेट हिंदूंनाच मारण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून मी तुमच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. राज ठाकरे हे संविधानाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सुनील शुक्ला यांनी केला.
सुनील शुक्ला म्हणाले की, राज ठाकरे तुम्ही उत्तर भारतीयांना, हिंदूंना मारु शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, तुमचा निषेध करतो. तुमच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणणारच, असेही ते म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही राज ठाकरे यांच्या बँकामधील मराठी भाषेच्या आग्रहाविरोधात भूमिका घेतली. ते म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे, याचे आम्हीही स्वागत करतो. मात्र बँकामध्ये घुसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. त्याचा आम्ही विरोध करतो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदी भाषिकांवर मनसैनिक हल्ला करत असल्याचा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे हे हल्ले होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते सुनिल शुक्ला यांनी केला आहे. सुनिल शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख आहेत. ते मुंबईचेच रहिवासी आहेत.
बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेले लोक जनशक्ती पक्षाचे (चिराग पासवान) खासदार राजेश वर्मा यांनी देखील हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.