
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासह रस्ते, नाल्या व सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे. या पार्श्वभूमीवर जनसेवक प्रमोदकुमार मस्के यांनी सोमवार दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी गंगाखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची भेट घेऊन संबंधित समस्या मांडल्या.
गौतम नगर, क्रांतीनगर, व्यंकटेश नगर परिसरात गेले एक ते दोन महिने नळाला पिण्याचे पाणी न आल्याने महिलांना आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिलांनी ही समस्या थेट जनसेवक मस्के यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली.
तसेच, या परिसरात कच्चे रस्ते व उघड्या नाल्यांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात परत जात असल्याने नागरिकांमध्ये दररोज वादविवाद होत आहेत.
याआधीही अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे जनतेने सांगितले. गौतम नगर, अजिंठा नगर, क्रांतीनगर, व्यंकटेश नगर, बंजारा कॉलनी, संयुग नगर, गुरुकृपा नगर, सिद्धार्थ नगर, तथागत नगर या भागांत उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी बोअरवेल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
सध्या निवडणुका होत नसल्यामुळे नगरपरिषदेवर प्रशासक कार्यरत आहेत, परिणामी नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडवल्या जात नाहीत.यामुळे संपूर्ण नगराचा विकास ठप्प झाला आहे.
या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा जनसेवक प्रमोदकुमार मस्के यांनी दिला असून, यावेळी नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.