दैनिक चालु वार्ता – शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन धोक्यात आले आहे. १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी मेंढपाळ “मोहन दामू चोरमले (वय ५०) व त्यांचा मुलगा सोनबा मोहन चोरमले” हे मेंढरे चारत असताना, ऊसात लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मेंढींवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एका मेंढीचा मृत्यू झाला असून अंदाजे १३-१४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोनबा चोरमले यांनी धाडसाने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दिशेने दगडफेक करत आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या मागे हटला, मात्र पुन्हा एकदा हल्ला करून मेंढीला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेनंतर चोरमले यांनी वनविभागातील कर्मचारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फ़ोन न घेतल्याने प्रतिसाद न मिळाल्याने, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते “निलेश मंदा यशवंत वाळुंज” यांच्याशी संपर्क साधला वाळुंज बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी फोनवरून मेंढपाळाला धीर दिला व तात्काळ वनपरीक्षेत्र अधिकारी शिरूर “निळकंठ गव्हाणे” यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. अधिकाऱ्यांनी लगेचच कर्मचारी घटनास्थळी पाठवले.
वाढती बिबट्यांची दहशत – ठोस उपाययोजना हवीच!
या घटनेनंतर निलेश वाळुंज यांनी शासनाकडे मागणी केली आहे की,
१. बिबट्याच्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी अन्नापुर आणि शिरूर तालुक्यात तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
२. बिबट प्रवण क्षेत्रातील नागरिकांना कायम अपंगत्व किंवा मृत्यु झाल्यास ५० लक्ष रुपयांचे विमा संरक्षण कवच द्यावे.
३. बिबट हल्ल्यात मनुष्यहानी किंवा कायम अपंगत्व झाल्यास बाधित कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेत सामावून घ्यावे.
४. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे घरांना मोफत तारेचे कुंपण देण्यात यावे.
५. पकडलेले बिबटे इतर राज्यांतील मोठ्या अभयारण्यात सोडावेत.
“प्रशासनाने जर याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर भविष्यात जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवावा लागेल,” असेही वाळुंज यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत लवकरच पद्मभूषण अण्णा हजारे यांचीही भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
“निलेश मंदा यशवंत वाळुंज” (सामाजिक कार्यकर्ते / व्हिसल ब्लोअर)”
