
दैनिक चालू वार्ता शिरूर प्रतिनिधी- इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
दि. २२ एप्रिल रोजी मौजे अण्णापूर (ता. शिरूर) गावात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा बेकायदेशीरपणे जाळण्यात आला. या आगीमुळे संपूर्ण परिसरात विषारी धुराचे लोट पसरले आणि त्यामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास झाला आहे. गावातील नागरिकांचे लहान मुले/जेष्ठ यांचे आरोग्य धोक्यात आले असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती गावातील काही सजग नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना दिली व संबंधित घटनेचे व्हिडिओदेखील पाठवले. वाळुंज यांनी तातडीने शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना व्हॉट्सअॅपवर घटनेबाबत माहिती दिली, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एफ.ओ. सुषमा कुंभार व एस.आर.ओ. कुकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला व्हॉट्स ॲप वर व्हिडिओ आणि संदेश पाठवले , परंतु त्यांनी फोन न उचलता, संदेशाकडेही दुर्लक्ष केले. ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब आहे.
सामाजिक हानी लक्षात घेता वाळुंज यांनी याप्रकरणी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर टाकळी हाजी पोलीस चौकीचे कर्मचारी भाऊसाहेब ठोसरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी किरण कुरंदळे व नागरिक प्रदीप दसगुडे यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर घातक कचऱ्याचे ढीग आढळून आले, जे केवळ मोठ्या वाहनांद्वारेच आणने शक्य होते. यामागे स्थानिक काही जणांना हाताशी धरून शेजारील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कायदे आहेत, पण अंमलबजावणीचा अभाव
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले की, “पर्यावरण रक्षणासाठी असंख्य कायदे असूनही प्रशासनाचा आणि जबाबदार अधिकाऱ्यांचा अंमलबजावणीबाबत गंभीर अभाव आहे. यामुळेच असे बेकायदेशीर प्रकार निर्भीडपणे घडत आहेत.”
वाळुंज यांनी याबाबत लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, अण्णापूर ग्रामसेवकांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यांना पाठवून तातडीची मदत केली असून, ग्रामपंचायतीमार्फतही याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात येणार आहे.
सरकारकडे मागणी: कडक कारवाई करावी
या प्रकारामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाल्याने आणि नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्याने, संबंधित यंत्रणांनी यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने आणि पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
“निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)”