
दैनिक चालू वार्ता चाकूर प्रतिनिधी -किशन वडारे
————————————————-
कबनसांगवी ता. चाकूर येथील शरद गणपतराव निला यांनी उदगीर आगाराची शिर्डी बस मध्ये प्रवासी महिलेने घाईगडबडीत सीटवर विसरलेले पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम दहा किलोमीटर पाटलाग करत त्याच प्रवासी महिलेला राहता वाहतूक नियंत्रण कक्षाधिकारी यांच्या समक्ष रोजी परत केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
कबनसांगवी येथील शरद निला हे उदगीर बस आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मंगळवारी उदगीरला येण्यासाठी शिर्डी स्थानकात बस प्लॅटफॉर्मला लावली असता राहूरीला लग्नासाठी निघालेली प्रवासी महिला शिर्डी उदगीर गाडीत बसली. मात्र या गाडी अगोदर शिर्डी पंढरपूर गाडी निघाली. म्हणून घाईघाईने आपल्याजवळची छोटी पर्स बसलेल्या जागेवर विसरून गेली. आपली पर्स विसरल्याचे लक्षात येईपर्यंत गाडीने पाच-सह किलोमीटर अंतर पार केले होते.
गाडीची वेळ झाली. शिर्डी उदगीर गाडीचे चालक शरद निला यांनी गाडीची नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेले होते. तेवढ्याच वेळात सदर प्रवासी गाडीतून उतरून गेला होता. गाडीत आल्यावर चालकाला सिटवरची पर्स निदर्शनास आली. मात्र प्रवाशी नव्हता. चालकाने प्रवाशाची चौकशी केली मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. शेजारच्या प्रवाशाने सदर प्रवासी महिला उतरुन दुसऱ्या गाडीत गेल्याचे सांगितले. चालकाच्या लक्षात आले की सोबत शिर्डी पंढरपूर गाडी लागली होती. सदर गाडीचा दहा किलोमीटर पाठलाग केला. अपर डिपर लाईट दाखवून व हाॅर्न वाजवून गाडी थांबवली. गाडीतील सदर महिला घाबरून रडत होती. त्या गाडीच्या वाहकांना सदर पर्सची दिली. दोन्ही राहता बस स्थानकात गेल्या. सदर महिलेला वाहतूक नियंत्रण कक्षात बोलावून कक्षाधिकारी किरण राऊत यांच्या समक्ष शरद गणपतराव निला यांनी किंमती ऐवज व काही रक्कम असेलेली पर्स महिलेच्या ताब्यात दिली. यावेळी शिर्डी पंढरपूर बसचे चालक गणेश लांडगे व वाहक पांडुरंग केसकर उपस्थित होते. सदर महिलेने आभार मानत पर्स मध्ये पाच तोळ्याचा दागिना आणि सात हजार रुपये रोख असल्याचे सांगितले आणि ते काढून दाखवले. बक्षीस म्हणून काही रक्कम महिला चालकाला देण्याचा आग्रह धरला मात्र निलांनी हे तर माझे कर्तव्य आहे म्हणून साफ नकार दिला. एसटीच्या लालपरीची प्रवाशात विश्वसनीयता हेच आमचं मोठ बक्षीस.