
शिंदेंच्या शिवसेनेकडील पाच खात्यांची कामगिरी दमदार, टॉप-3 मध्ये कोण ?
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाताली सर्व खात्यांच्या 100 दिवसांतील कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रिया राबवली जात आहे.
या प्रक्रियेमध्ये प्रत्येक खात्याने शंभर दिवसांत केलेल्या कामांची माहिती सादर केली आहे. त्यामध्ये धोरणात्मक निर्णय, प्रकल्पांची अंमलबजावणी, जनहिताच्या योजना, तसेच महसूल आणि प्रशासकीय सुधारणा यांचा समावेश आहे. महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला असून त्या आढाव्यात मंत्रालयातील आठ विभागांची कामगिरी सरस ठरली आहे. त्यामुळे हे आठ विभाग कोणते याची उत्सुकता लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही मूल्यांकन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. या ऑडिटनंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली. आता या आठ विभागांमधून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. महायुती सरकारमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केली, याचा अहवाल लवकरच समोर येणार आहे.
महायुती (Mahayuti) सरकारमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खात्यांमध्ये शिंदे गट क्रमांक एकवर आहे. या आठ विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे पाच विभाग आहेत. दुसरीकडे भाजपचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ एका विभागाचा समावेश आहे. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणत्या पक्षाचा विभाग अव्वल ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे आठ विभाग आहेत आघाडीवर
एकनाथ शिंदे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रताप सरनाईक यांच्याकडील परिवहन विभाग, आदिती तटकरे यांच्याकडील महिला व बालविकास विभाग, जयकुमार गोरे यांच्याकडील ग्रामविकास विभाग, देवेंद्र फडणवीस यांच्याकडील उर्जा विभाग, प्रकाश आबिटकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य विभाग, उदय सामंत यांच्याकडील उद्योग विभाग तर एकनाथ शिंदे यांच्याकडील गृहनिर्माण विभाग आघाडीवर आहेत.
आगामी काळात लवकरच राज्यातील महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारा विभाग ठरणार आहे. त्यामध्ये अव्वल तीन विभाग कोणते असणार याकडे लक्ष लागले आहे. लवकरच याचा निकाल जाहीर केला जाणार असून त्यानंतर इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
या विभागांची ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल. चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोनमध्ये, मध्यम कामगिरी असणारे विभाग यलो झोनमध्ये आणि खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोनमध्ये अशाप्रकारे ही वर्गवारी असणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.