
गावेची गावे पाण्याखाली गेल्याने पाकिस्तानात आणीबाणी…
जम्मू काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साडेसाती सुरु झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आज अचानक पाकिस्तानचा ‘आटा गिला’ झाला.
आज शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्तीन बाला भागात झेलम नदीला पूर आला. हा पूर एवढा मोठा होता की, मुझफ्फराबाद प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर करावी लागली. नदीकाठच्या लोकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मशिदीतून पुराबाबत अपडेट द्यावे लागले. हे पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता भारताने सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला.
झेलमला अचानक पूर
उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातील चकोठी येथे पाणी शिरल्याने झेलम नदीला आज अचानक मोठा पूर आला. ही नदी पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमधून वाहत असल्याने तेथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिकांमध्ये धावपळ उडाली. सगळीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली. मशिदींमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
पाणीपातळी ७ ते ८ फुटांनी वाढली
पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की, झेलम नदीचे पाणी भारतातील अनंतनाग येथून आत शिरले. ते चाकोठी परिसरातून वाहत होते. चाकोठीमध्ये पाण्याच्या प्रवाहात अचानक असामान्य वाढ दिसून आली. ज्यामुळे नदीकाठच्या गावांमधील लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली. झेलम नदीची पाण्याची पातळी सामान्यपेक्षा ७-८ फूट जास्त झाली आहे. लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतावर केला आरोप
मुझफ्फराबादचे उपायुक्त मुदस्सर फारूख म्हणाले की, झेलम नदीला कमी पातळीने पूर आला आहे आणि त्यातून २२,००० क्युसेक पाणी वाहत आहे. त्याच वेळी, पाकिस्तानच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) म्हटले आहे की, अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पाणी मंगला धरणापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. खाली प्रवाहात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे की, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी भारताने इशारा द्यायला हवा होता, असेही पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे.
भारताचे म्हणणे काय ?
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स रिव्हर्स अँड पीपल (एसएएनडीआरपी) चे हिमांशू ठक्कर म्हणाले की, खरी समस्या पश्चिमेकडील नद्यांशी संबंधित आहे. जिथे पायाभूत सुविधांच्या मर्यादा आपल्याला पाण्याचा प्रवाह त्वरित थांबवण्यापासून रोखतात. चिनाब खोऱ्यात आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, जे पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील. तोपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे पाणी पाकिस्तानकडे वाहत राहील. एकदा हे कार्यान्वित झाले की, भारतात एक नियंत्रण यंत्रणा असेल जी सध्या अस्तित्वात नाही. पर्यावरण कार्यकर्ते आणि मंथन स्टडी सेंटरचे संस्थापक श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले की, भारत पाण्याचा प्रवाह लवकर वळवू शकतो. सध्या, पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे.