
सुरज चव्हाणच्या ‘झापूक झूपुक’ कडे प्रेक्षकांची पाठ; थिएटरमध्ये फक्त दोन प्रेक्षक ?
आधी फोन मग छोटा पडदा आणि मग मोठा पडदा असा प्रवास करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा ‘झापूक झूपुक’ चित्रपट काळ २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालाय.
सुरजने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्याने ‘बिग बॉस मराठी’ जिंकताच संपूर्ण महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला घेऊन ‘झापूक झूपुक’ हा चित्रपट बनवला. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केलीये पाहूया.
थिएटरमध्ये २ प्रेक्षक
सुरज जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात होता तेव्हा त्याला लाखो लोकांनी पाठिंबा दर्शवला होता. त्याला भरभरून वोटिंग केलं होतं. आजही त्याचे चाहते लाखोंमध्ये आहेत. त्याच्या एका रीलला लाखो लाइक आणि हजारो कमेंट असतात. मात्र आता त्याचा चाहतावर्ग त्याला थिएटरमध्ये सपोर्ट करायला कमी पडताना दिसतोय. सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने एक रील शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या रीलमध्ये संपूर्ण थिएटर रिकामं दिसतंय. तो व्यक्ती या व्हिडिओमध्ये म्हणतो, आता मी सुरजचा ‘झापूक झूपुक’ हा चित्रपट पाहणार आहे तेही फुल्ल थिएटरमध्ये. पिक्चर चालू व्हायला फक्त १ मिनिट बाकी आहे. आणि या थिएटरमध्ये आम्ही दोघे जण सिनेमा बघणार आहोत.’
काय म्हणाले प्रेक्षक?
एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘250/300 खर्चायला पब्लिकला स्टोरी पण तशी असावी लागते. भावनिक होउन किंवा फक्त मराठी माणूस आहे म्हणून कोणीही सिनेमाला येत नसतो..येणारही नाही.’ दुसऱ्याने लिहिलं, ‘ऑनलाइन सपोर्ट करायला पैसे नाही लागत खऱ्या आयुष्यात सपोर्ट करायला लागतात.’ आणखी एकाने लिहिलं, ‘आम्ही प्रेक्षक आहोत पण खुळे नाही की स्वतःचे पैसे खर्च करून “काहीही” बघायला जायला, बाकी राहिला मराठी सिनेमा मोठा होण्याची गोष्ट तर दर्जेदार चित्रपट काढा लोकं आपोआप गर्दी करतील. “सैराट” “नटसम्राट” “मुळशी पॅटर्न” “काशिनाथ घाणेकर” “धर्मवीर” “पावनखिंड”…. अशी अनेक उदाहरण आहेत.’
किती केली कमाई?
सुरजचा हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने संपूर्ण देशात फक्त २४ लाखांची कमाई केलीये. हा अहवाल वेबसाइटवरील माहितीवरून देण्यात आलेला आहे. सुरजची लोकप्रियता पाहता त्याच्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी केवळ २४ लाखांची कमाई होणं ही गोष्ट चांगली नाही.