
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.
चंद्रहार पाटलांच्या भेटीनंतर आणि भोजनानंतर ते ठाकरे गट सोडणार अशी चर्चा होती त्यावरती त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २००५ सालापासून म्हणजेच जवळपास २० वर्षांपूर्वी पासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मला स्नेह भोजनाचे आमंत्रण दिले, भोजन करून १५ ते २० मिनिटात मी बाहेर पडलो.
यावेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली. परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की. असं चंद्रहार पाटलांनी म्हटलं आहे.
चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा
चंद्रहार पाटील हे पैलवान आहेत. सध्या ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर आहेत. चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्याचबरोबर चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्यां पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला होता. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
गुरुवारी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरेंचा पैलवान पक्षाला रामराम ठोकणार अशी चर्चा होती. त्यावर आता चंद्रहार पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.