
सीमा हैदरची मोदींना विनंती…
काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर प्रेमासाठी पाकमधून अवैधरीत्या भारतात आलेल्या सीमा हैदरचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावर सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आपल्याला भारतात राहू देण्याची विनंती केली आहे.
सीमाचा एक इंस्टाग्राम व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सीमा तिला पाकिस्तानात परत जायचे नसल्याचे सांगते. मी पाकिस्तानची मुलगी होते. परंतु आता मी भारताची सून आहे. माझी मोदी आणि योगीजींना विनंती आहे की, मला येथेच राहू द्या, अशी विनंती सीमाने केली आहे. तिच्या वकिलांनी देखील सीमाला भारतात राहू दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सीमा आता पाकिस्तानी नागरिक नाही. तिने ग्रेटर नोएडाच्या सचिन मीणा नामक युवकाशी लग्न केले आहे. त्यामुळे तिचे नागरिकत्व आता तिच्या पतीशी संबंधित आहे. या दाम्पत्याला अलीकडेच एक मुलगीदेखील झाली. त्यामुळे सीमाला पाकमध्ये परत पाठवणे योग्य होणार नाही, असे तिचे वकील ए.पी. सिंह म्हणाले.
पाकच्या जैकोबाबादची रहिवासी असलेली सीमा ऑनलाइन गेम खेळताना सचिनच्या प्रेमात पडली आणि मे २०२३ मध्ये तिचे घर सोडून चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सध्या ते दोघे जामिनावर आहेत.