
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एकत्र येण्याबाबत भाष्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानंतर या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी या दोन्ही भावांनी राजकारणात एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काहींनी मात्र ते एकत्र येणार नाहीत, असेही म्हटले आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया आली असून राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील जनता तुमच्या एकत्र येण्याची वाट बघतेय… उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र या, अशा आशयाचा बॅनर मातोश्रीबाहेर लावण्यात आलेला आहे. त्याबाबत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राणे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंवर घसरले, तर राज ठाकरे आमचे मित्र आहेत, असे म्हणून त्यांच्याबाबत सांभाळून बोलले.
नारायण राणे म्हणाले, कोण एकत्र येणार? काय आहे का? कोणी कोणाला आवाहन केलं. ते देणारे कोण आहेत, ते त्यांचंच दुकान आहे. तसं आवाहन करणारी त्यांचीच माणसं आहेत ती. मी अजून त्यावर भाष्य केलेलं नाही. दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी माझ्या घरी अनेक पत्रकार येऊन गेले.पण, मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं मी त्यांना सांगितलं
अरे दोन भाऊ एकत्र यायला आम्हाला नको का? या… एकत्र या. ते राजकारणात सक्रीय आहेत. आता राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय आहे आता त्यांच्याकडे. वीस झाले हो (शिवसेनेचे) आमदार. पुढच्या निवडणुकीत त्यांचे (उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे) पाचही नसणार. पाचही आमदार निवडून येणार नाहीत, असा दावाही नारायण राणेंनी केला.
दुसऱ्याकडे (मनसे प्रमुख राज ठाकरे) काहीच नाही. ते आमचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. पण त्यांचे वीस आमदार व्हावेत आणि यांचे पाच. बस्स पंचवीस, असे म्हणून नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली.