
अंबानी’प्रमाणेच बिझनेस, नेटवर्थ तर…
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे, पण त्यांचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची संपत्ती आणि जीवनशैली या संकटापेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत्ये. अलीकडेच उघड झालेल्या आकडेवारीनुसार, जनरल मुनीर यांची एकूण संपत्ती सुमारे 6,77,54,636 रुपये (यूएस$८००,०००) असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेगवेगळे व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून ही संपत्ती मिळवली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती कंगाल असूनही लष्करप्रमुख प्रमुख मात्र श्रीमंत आयुष्य जगतात.
असे म्हटले जाते की पाकिस्तानी सैन्य देशात 100 हून अधिक व्यवसाय चालवते आणि यातून लष्करप्रमुख आणि अधिकाऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते. पाकिस्तानच्या रिअल इस्टेट क्षेत्रात लष्कराचे वर्चस्व आहे. पाकिस्तानी सैन्य व्यवसायातून अमाप संपत्ती कशी कमावते ते आम्ही सविस्तरपणे जाणून घेऊया..
लष्करप्रमुखांचा अब्जावधींचा व्यवसाय
पाकिस्तानमध्ये, लष्करप्रमुखांवर अनेकदा असा आरोप लावला जातो की देशाची सेवा करण्यापेक्षा त्यांवा त्यांची संपत्ती वाढवण्यात अधिक रस आहे. माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा ते सध्याचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यापर्यंत अनेक उदाहरणं समोर आहेत. लष्कराचे मुख्य काम देशाचे रक्षण करणे आहे, परंतु पाकिस्तानमध्ये सैन्य केवळ संरक्षणापुरते मर्यादित नाही. पाकिस्तानी लष्कर हेदेशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नियंत्रित करते.
फौजी फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, शाहीन फाउंडेशन आणि बहरिया फाउंडेशन सारख्या संस्था लष्कर चालवतं. या संस्था नावाने कल्याणकारी वाटू शकतात, परंतु प्रत्यक्षात त्या एका अतिशय शक्तिशाली कॉर्पोरेट नेटवर्कचा भाग आहेत. या व्यवसायांद्वारे सैन्य केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वाची भूमिका बजावते.
पाकिस्तानची सीक्रेट कमाई
पाकिस्तानी सैन्याची ताकद केवळ त्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये आणि सैनिकांमध्येच नाही तर त्यांच्या प्रचंड व्यावसायिक साम्राज्यातही आहे. प्रसिद्ध लेखिका आयशा सिद्दिका यांचे ‘मिलिटरी इंक: इनसाइड पाकिस्तान्स मिलिटरी इकॉनॉमी’ हे पुस्तक हे वास्तव सखोलपणे उलगडते. या पुस्तकानुसार, पाकिस्तानी सैन्य हे केवळ संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नाही तर सिमेंट, खते, बँकिंग, दुग्धव्यवसाय, वाहतूक आणि गृहनिर्माण यासारख्या क्षेत्रातही त्यांचा व्यापक व्यावसायिक प्रभाव आहे.
रिअल इस्टेट बनला सर्वात मोठा व्यवसाय
लष्कराची व्यावसायिक कामं अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेली असली तरी, त्यांचा सर्वात मोठा आणि सर्वात फायदेशीर व्यवसाय रिअल इस्टेट आहे. कराची, लाहोर आणि इस्लामाबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये, लष्कराने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अधिग्रहित केलेल्या जमिनी व्यावसायिक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये रूपांतरित केल्या आहेत. हे प्रकल्प प्रामुख्याने संरक्षण गृहनिर्माण प्राधिकरण (DHA) अंतर्गत येतात, ती अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता म्हणून ओळखली जाते.
आर्थिक ताकदीचा काही हिशोबच नाही
आयशा सिद्दीकी यांच्या पुस्तकानुसार, 2007 मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या व्यावसायिक उपक्रमांचे एकूण मूल्य 20 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. विविध तज्ञांचा असा विश्वास आहे की, हा आकडा 40 ते 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 85 ट्रिलियन रुपये) दरम्यान असू शकतो. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे सैन्याच्या या कमाईचे कोणतेही पारदर्शक रेकॉर्ड उपलब्ध नाही, तसेच कोणतीही स्वतंत्र संस्था त्यावर लक्ष ठेवत नाही. पाकिस्तानचे सैन्य राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली हे आर्थिक डेटा लपवून ठेवते.
जनरल असीम मुनीरचे नेटवर्थ किती ?
सध्याचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याबद्दलही आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका पाकिस्तानी सोशल मीडिया युजरनुसार, असीम मुनीरची घोषित एकूण संपत्ती सुमारे 8 लाख डॉलर्स (अंदाजे 6,77,54,636 रुपये) आहे. पण या गुप्त व्यवसायांकडे पाहिलं तर त्यांची खरी संपत्ती यापेक्षा खूप जास्त असू शकते, याचा अंदाज कोणीही लावू शकेल. त्या तुलनेत, माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या संपत्तीचे उदाहरण समोर ठेवले जाते. 2018 साली बाजवा जेव्हा लष्करप्रमुख झाले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नव्हती, परंतु 2022 मध्ये ते निवृत्त होईपर्यंत त्यांच्या कुटुंबाची संपत्ती सुमारे 13 अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचली होती.