
AI चे भाकीत ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य!
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातील पाकिस्तानविरुद्धचा राग शिगेला पोहोचलाय. आता भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी प्रतिक्रिया अनेक भारतीय व्यक्त करतायत.
पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले तर काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नाचे आर्टिफिशियल इंटेलिजेंसने दिलेले उत्तर आश्चर्यकारक आहे. सध्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण एआयकडून घेतोय. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भातील प्रश्नही एआयलाच विचारण्यात आलाय. एआयने यावर काय उत्तर दिलंय, जाणून घेऊया.
भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धामुळे केवळ 2 देशांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा नाश होईल. यामध्ये कोट्यवधी लोकांचे प्राण जाऊ शकतात. हवामान व्यवस्था बिघडू शकते आणि संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, असं उत्तर एआयने दिलंय.
‘हे युद्ध कोणीही जिंकणार नाही’
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणते की, हे युद्ध कोणीही जिंकणार नाही. यात मानवता हरेल. कारण दोन्ही देश अणुशक्ती आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही सुमारे 170 ते 172 अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे शाहीन आणि घौरी सारखी क्षेपणास्त्रे आहेत. तर भारताकडे अग्नि-5 सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ब्रह्मोससारखी अचूक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.
भारत जमीन, पाणी आणि आकाश या मार्गांनी अणुहल्ला करण्यास सक्षम आहे तर पाकिस्तान तांत्रिकदृष्ट्या मागे आहे. जर दोन्ही देशांनी एकमेकांवर 100 अणुबॉम्ब टाकले तरी सुमारे 2 कोटी लोक आपले प्राण गमावू शकतात. यासोबतच तापमानात घट झाल्यामुळे शेती उद्ध्वस्त होईल आणि संपूर्ण जगात अन्न संकट निर्माण होऊ शकते, असंही एआयने आपल्या उत्तरात म्हटलंय.
याचा परिणाम आशियापुरता मर्यादित नसेल
एका अहवालानुसार, या युद्धाचा परिणाम केवळ आशियापुरता मर्यादित राहणार नाही. तर तो जागतिक पातळीवर होईल. अणुयुद्धाचे दुष्परिणाम बराच काळ टिकतील. रेडिएशनमुळे कर्करोग, जन्मजात दोष आणि इतर आजार पसरतील. माती, हवा आणि पाणीदेखील विषारी होईल. कोट्यवधी लोक बेघर आणि उपाशी राहतील. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये असे युद्ध झाले तर तो पराभव फक्त एका देशाचा नसून संपूर्ण मानवतेचा असेल, असेही या अहवलात म्हटलंय.
यावर तज्ञांचे काय मत आहे ?
सध्या दोन्ही देशांतून एकमेकांविरुद्ध भडक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानकडून खूप काही घडतय. तिथले नेते अधिक चिथावणीखोर भाषणं ठोकतायत. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश असू शकतो पण भारत हा एक जबाबदार आणि यशस्वी देश आहे. अशा परिस्थितीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना भारत नक्कीच धडा शिकवेल. असे असताना भारताकडून कधीही मानवतेचे उल्लंघन होणार नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. या भाकिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर AI हे एक कृत्रिम तंत्रज्ञान आहे. ते नेहमीच बरोबर किंवा नेहमीच चूक असेलच असे नाही.