
राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर ते भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झाले. या सत्तेचा पुरेपूर वापर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी केला.
मात्र आता चित्र बदलू लागले आहे.
राज्यातील सध्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपद्रमूल्य आणि ताकद जोखण्यात त्यांचे प्रतिस्पर्धी कमी पडले असे सध्याचे चित्र आहे. निधीचे अमिष आणि राजकीय नेत्यांना काय हवे, याचे गणित एकनाथ शिंदे यांचे पक्के आहे. त्यामुळे हा पक्ष आता शहकारी भाजपसह सगळ्यांचीच धाकधूक वाढविणारा ठरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह नवी मुंबई, नाशिक, पुणे अधिक शहरांमध्ये आपली ताकद प्रामुख्याने शिवसेना ठाकरे पक्षाचे लोकप्रतिनिधी फोडून आपली ताकद वाढविण्यात केला आहे. नाशिक शहरात शिवसेना ठाकरे पक्षाचे ३५ पैकी १८ नगरसेवक फोडण्यात शिंदे गट यशस्वी झाले. त्याचा धसका भाजपनेही घेतला आहे.
शहरातील काँग्रेसचे डॉ हेमलता पाटील, जॉय कांबळे हे दोन काँग्रेसचे, मेघना साळवे या मनसेच्या आणि समीना मेनन या अपक्ष असे असे २२ माजी नगरसेवक सध्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आता महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा करीत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकीय राज आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेत बऱ्यापैकी शिरकाव केला आहे. निवडणुका झाल्या नसल्या तरीही मनसेत दाखल झालेल्या नगरसेवकांच्या प्रभागात कामांसाठी त्यांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या भाजपचे सर्व माजी नगरसेवक उपेक्षित आणि पक्षाला सोडचिठ्ठी देत मनसेत दाखल झालेल्यांची चंगळ अशी स्थिती आहे.
दोन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करणारे इच्छुक सगळेच सैरभैर आहेत. या स्थितीचा पुरेपूर लाभ राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. निवडणुका होत नसल्या तरी महापालिकेवर मात्र थेट महायुतीचे अर्थात पालकमंत्र्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे अनेक इच्छुक शिवसेना शिंदे पक्षाकडे आपोआप आकर्षित होत आहे.
सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रतिस्पर्ध्यांचे २२ नगरसेवक पक्षात दाखल करून घेतले आहे. यामध्ये महानगरप्रमुख बंटी तिदमे, संपर्क नेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह विविध नेत्यांचा सहभाग आहे. याशिवाय अनेक पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. याचा चांगलाच धसका आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता महायुतीचा घटक भाजपने घेतला आहे.