राऊतांनी घेतली पवारांची भेट !
शिवसेना (ठाकरे) प्रवक्ते तथा खासदर संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे येत्या 17 मे रोजी मुंबईत प्रकाशन होणार आहे.
या पुस्तक प्रकाशानेच औपचारिक निमंत्रण देण्यासाठी राऊतांनी पवारांची भेट घेतली. यावेळी उभयातांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण झाली. त्यासोबतच सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि घडामोडींवरही चर्चा झाली. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात या महिन्यात सुनावणी होणार आहे.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीची माहिती शरद पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक केली आहे. पावरांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीनदरम्यान खासदार राऊत यांनी त्यांचे पुस्तक शरद पवारांना भेट दिले तर, शरद पवारांनी रोहन तावरे यांनी वन्यजीवनावर लिहिलेले पुस्तकावर त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मनी लाँड्रिंग प्रकरणातील कथित घोटाळ्यात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यांची रवानगी अर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. या काळातील अनुभवांवर त्यांनी ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे.
‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
राज ठाकरे यांना निमंत्रण देणार का, या प्रश्नावर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, लोकशाही जिवंत राहावी असे वाटते त्या सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचे ते माध्यमांसोबत बोलताना म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशनाला राज ठाकरे येणार का, याची सर्वांनाच उत्सूकता आहे.
