
नवी मुंबईतील एका कार्यक्रमप्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच अनेक राजकीय रहस्ये उघड केली आहेत. 1995 साली राज्यात पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर पहिल्यांदाच भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले.
त्यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत पूर्वीच ठरले होते. त्यानुसार तीन नावांची चर्चा होती. या तीन नावाविषयी मला त्याचवेळी माहिती होती अन झालेही त्याच प्रमाणे असे देखील गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे, सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांची नावे चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले.
1995 साली झालेल्या निवडणुकीनंतर मनोहर जोशी यांनी गणेश नाईक यांना मुख्यमंत्री कोण होणार ? अशी विचारणा केली होती. त्यावर गणेश नाईक (Ganesh Naik) म्हणाले की, जर राज्यात 145 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. 144 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर सुधीर जोशी आणि त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या, तर मनोहर जोशींना संधी होती. असाच फॉर्म्युला त्यावेळी ठरला होती. अन शेवटी तसेच घडले. सत्तास्थापन करण्यास त्यावेळी काही आमदाराची गरज होती. शरद पवार यांनी मराठवाडा आणि विदर्भातील आमदारांना एकत्र आणून सरकार स्थापन करण्यास मदत केली, असेही गणेश नाईक म्हणाले.
1992 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी गणेश नाईक यांना गट नेता बनण्याची सूचना केली. गणेश नाईक यांनी ज्येष्ठ नेत्यांना डावलणे योग्य नसल्याचे सांगून नकार दिला. पण त्यानंतर शिवसेना भवनात बाळासाहेबांनी त्यांची गटनेतेपदी घोषणा केली. यावेळी या पदासाठी अनेकजण इच्छुक होते त्यामध्ये सुभाष देसाई व सरपोतदार देखील इच्छुक होते, असेही गणेश नाईक म्हणाले.
धीरूभाई अंबानी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते. ते सी विंड-कफ परेड येथे धीरूभाई अंबानी यांच्या घरी आठ ते पंधरा दिवसांनी गप्पा मारायला एकत्र बसायचे. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना गणेश नाईक यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा किस्सा देखील गणेश नाईक यांनी यावेळी सांगितला.
एका बैठकीवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यात चर्चा सुरू होती. मला माहित नाही तिथे काय बोलणे झाले. मनोहर जोशी काहीतरी लिहित होते. त्यानंतर बाळासाहेबांनी मला एक चिठ्ठी दिली. ती प्रेसला द्यायला सांगितली.मी गाडीत बसलो आणि ती चिठ्ठी विकास महाडिकला वाचायला दिली. ती वाचल्यावर मी बाळासाहेबांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला हे पसंत नाही आणि मी ही चिठ्ठी प्रेसला देणार नाही.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘तुला जे योग्य वाटेल ते कर’, असा प्रसंगदेखील गणेश नाईक यांनी यावेळी सांगितला.