
भाजपकडून होणारी कोंडी आणि साखर कारखान्यांसह इतर संस्थांना वाचविण्यासाठी अजित पवारांसोबत जाणे किंवा स्वतंत्ररित्या भाजपशी युती करावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती.
माढा लोकसभा निवडणुकीतील संघर्षामुळे मोहिते-पाटलांनी भाजपला अंगावर घेत माढ्याची जागा खेचून आणली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही चार जागांवर मोहिते-पाटलांमुळे युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामुळे जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राम सातपुते, माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मोहिते-पाटलांवर हल्ला चढविण्यास सुरुवात केली. दोघांनाही पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी मोहिते-पाटलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनीही पहिला दौरा माळशिरसचा करीत मोहिते-पाटलांच्या विरोधात यल्गार पुकारला. प्रत्येक गोष्टीत होत असलेली कोंडी मोहिते-पाटीलांना त्रासदायक ठरत आहे. तशातच मोहिते-पाटलांच्या काही संस्थांची चौकशी करून त्यांना थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपचे नेते करू लागले.
या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांशी जुळवून घेण्याची मागणी छुप्या पद्धतीने सुरू केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोहिते-पाटील परिवाराशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांच्यामार्फतही हा विषय शरद पवारांपर्यंत पोहोचवला होता. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचा पराभव करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शरद पवारांचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण सत्ता गेल्याने विरोधात बसण्याची वेळ त्यांच्यावर आली.
मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद
भाजपकडून होणारी कोंडी फोडायची असेल आणि संस्था वाचवायच्या असतील, तर अजित पवारांसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. आता शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत वक्तव्य केल्याने मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.