
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश !
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन बदला घेतला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या हल्ल्यात मुरीदके येथील दहशवाद्यांचाही खात्मा झाला. येथील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करही उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
हल्ल्यानंतर, मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण हाफिज अब्दुल रौफ याने केले, त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तो स्थानिक धर्मगुरू असल्याचे सांगत या प्रकरणापासून हात झटकले. मात्र, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून पाकिस्तानी लष्कर खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे.
पत्रकार तल्हा सिद्दीकी यांनी अब्दुल रौफचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्ट त्यांनी एक कॅप्शन दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘आपल्या शिष्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणारे हाफिज अब्दुल रौफ काश्मीरमधील दहशतवादाचे गौरव करत आहे”, हा व्हिडीओ पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला. पाकिस्तानी सैन्य अजूनही रौफला स्थानिक धर्मगुरू म्हणेल का? , असा सवाल उपस्थित होत आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
अब्दुल रौफ याच्या शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मुस्लिमांना उद्देशून तो म्हणत आहे की, ‘आम्ही पाहिले आहे की अमेरिका किती शक्तिशाली आहे. आपण रशियन योद्ध्यांना अफगाणिस्तानातून पळून जाताना देखील पाहिले आहे. १९६५ मध्ये भारताची वाईट अवस्था आपण पाहिली आहे. काश्मीरमध्ये आपल्या दोन मुजाहिदीनना दोन हजार लोकांशी लढताना पाहिले आहे. आमच्या सैनिकांनी श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे.
भारतासह जगातील अनेक देश दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत, पण पाकिस्तान आपल्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी कारवाया होत असल्याचे नाकारत आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर या प्रकरणात पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. अब्दुल रौफ सारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात सन्मानित केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.