
PM मोदींच्या एका निर्णायने बॅकफुटवर गेलेल्या भाजपला फ्रंटफुटवर आणण्यासाठी ‘CM योगींचा’ प्लॅन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी ही घोषणा केल्यापासूनच काँग्रेससह सर्व विरोधकही चकीत आहेत. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांसाठी आणि हिंदुत्ववाद्यांसाठी तर हा निर्णयच कोड्यात टाकणारा आहे.
ज्या गोष्टीची गेल्या काही वर्षांपासून मोदींसह सगळेच भाजपचे नेते चार हात अंतर राखून होते, तीच गोष्ट कशी स्वीकारली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जातिनिहाय जनगणनेमुळे भाजप समर्थक उच्चवर्णीय हिंदू, दलित आणि ओबीसी यांच्यातील दरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदूंना एकत्र आणण्याचे काम अधिक कठीण आव्हान भाजपपुढे आहे. अशावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोबर निती शोधून काढली आहे. तमाम हिंदूंना एकत्र आणण्यासाठी त्यांनी या नव्या कल्पनेला खतपाणी घातले आहे.
गोबर निती काय आहे?
हिंदूंना एका छताखाली आणण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नव्या प्रभावी उपायाचा शोध गायींपर्यंत येऊन थांबला आहे. सर्व सरकारी इमारती गायीच्या शेणाने रंगविण्याचा निर्णय आदित्यनाथ योगी यांनी घेतला आहे. थोडक्यात गायींना पुन्हा एकदा राजकीय शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार आदित्यनाथ यांचा दिसून येत आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे राज्यातील नोकरशाहीने तत्परतेने स्वागत केले. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे गती मिळेल, असा आशावाद नोकरशाहीने व्यक्त केला आहे. पण शेणाचा वापर योगी आदित्यनाथ त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या इमारतीपासून करणार का, असा प्रश्न विरोधक विचारत आहे.
रंग कसा तयार करणार?
उत्तर प्रदेशातील विविध गावांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, 7 हजार 699 गोशाळांमध्ये अंदाजे 12 लाख भाकड गायी आहेत. या गोशाळांमधून उपलब्ध असलेल्या सर्व शेणांपासून रंग बनविण्यात येणार आहे. सर्व सरकारी इमारतींवर वापरण्यासाठीच्या प्रस्तावावर व्यवहार्यता अहवाल तयार निर्देश त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. याशिवाय गोशाळांमधून गोळा करण्यात येणाऱ्या गोमूत्राचाही व्यावसायिक वापर करण्याचे त्यांनी सुचविले आहे.
यातून फायदा काय होऊ शकतो?
जातिनिहाय जनगणनेमुळे जातीय फूट पडून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ‘गोबर नीती’ प्रभावी ठरेल, ‘गायींचा रक्षणकर्ता’ म्हणून प्रतिमा आणखी खोलवर रुजेल, अशी आशा योगी आदित्यनाथ यांना वाटत आहे. या गाय मोहिमेमुळे तात्पुरते का होईना पण लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्यास मदत होईल. त्याचा फायदा भाजप नेतृत्वाला आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांना पुढची रणनीती तयार करण्यासाठी होईल, असा अंदाज आहे.