
३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश; रशियाचेही समर्थन…
कॉरिबियन समुद्रात मोठे रणधुमाळीचे संकेत मिळत आहेत. एका बाजूला अमेरिका आपली सर्वात अत्याधुनिक F-35 फायटर जेट्स, गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आणि एक अण्वस्त्रधारी-सबमरीन व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर तैनात करत आहे, तर दुसऱ्या बाजूला व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी याला थेट आक्रमण मानून युद्धाची तयारी सुरु केली आहे.
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील राजकीय तणावाने युद्धाची चाहूल लागली आहे.
व्हेनेझुएलाने अमेरिकेच्या संभाव्य आक्रमणाविरोधात ३७ लाख मिलिशिया सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेने ही कृती ‘ड्रग कार्टेल्स’ विरुद्धच्या युद्धाची तयारी म्हणून दाखवली असली तरी, राष्ट्राध्यक्ष निकोलास मादुरो सरकारने याला आपल्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आणि सत्तापालट करण्याचा कट मानले आहे. या वाढत्या तणावामुळे मादुरो यांनी तातडीने ‘स्टेट ऑफ इमर्जन्सी’ (आणीबाणी) लागू केली असून, संपूर्ण देशाच्या सशस्त्र दलांना ‘हाय अलर्ट’वर ठेवले आहे.
३७ लाख नागरिकांची सेना (मिलिशिया) सक्रीय
मादुरो यांनी 3.7 दशलक्ष नागरिक-सैनिकांची (मिलिशिया फोर्सेस) फौज सक्रीय केली आहे. हे सामान्य नागरिक असून, ते देशाच्या रक्षणासाठी युद्ध लढण्यास सज्ज झाले आहेत. “कोणतेही साम्राज्य व्हेनेझुएलाच्या पवित्र भूमीला स्पर्श करू शकत नाही,” अशा शब्दांत मादुरो यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.
व्हेनेझुएलाने आपली हवाई सुरक्षा प्रणाली (Air Defence System) अधिक मजबूत केली आहे. तसेच, रशियन बनावटीच्या Su-30 जेट्स आणि पाणबुड्यांनाही ‘अँटी-शिप मिसाईल्स’ने सुसज्ज करण्यात आले आहे.
तेलाचे साठे आणि सत्तापालट हेच खरे कारण?
वरकरणी हे राजकारण अंमली पदार्थांच्या तस्करीवरून सुरू झाले असले तरी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते यामागे मोठे भू-राजकीय हितसंबंध दडलेले आहेत. व्हेनेझुएला हा जगातील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश आहे. मादुरो यांना सत्तेतून हटवून अमेरिकेला येथील तेल उद्योगावर नियंत्रण मिळवायचे आहे, असा व्हेनेझुएलाचा आणि त्यांच्या सहयोगी देशांचा (रशिया, क्यूबा) ठाम आरोप आहे. अमेरिकेने मादुरो यांच्या अटकेसाठी ५० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. लॅटिन अमेरिकेत या तणावामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी
क्युबाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला व्हेनेझुएलेवर हल्ला करण्यावरून इशारा दिला आहे. अमेरिकन एफ-३५ जेट्सनी व्हेनेझुएलेच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे. रशियानेही व्हेनेझुएलाला समर्थन दिले आहे, तर अमेरिकेचे मित्र कोलंबिया सारखे देश तणाव वाढवत आहेत. २०१७ पासून ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर ड्रग आरोप लावले असून, राजकीय बदलासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हेनेझुएलाने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केली असून, व्हेनेझुएलावर हल्ला म्हणजे संपूर्ण लॅटिन अमेरिकेला धोका, असे म्हटले आहे.