
बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस…
विधानसभा निवडणुकीनंतरचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.येत्या काही महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याच धर्तीवर शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शिंदेंसह शिवसेनेकडून अनेक नेत्यांनी सडकून टीका केली.
यावेळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (ता.2 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात आक्रमक भाषण केले. त्यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी खळबळजनक दावा करत मोठी मागणी केली आहे. त्यांनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? याचा तपास करण्यात यावा,असं विधान केलं आहे.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह हातांचे ठसे घेण्यासाठी मातोश्रीवर तसाच ठेवून देण्यात आला होता, असा आरोप रामदास कदम करत खळबळ उडवून दिली आहे. हा मेळावा पार पडल्यानंतरही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना आपण आपल्या आरोपावर ठाम असल्याचं म्हटलं.
रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंबाबत आपण जे वक्तव्य केलं, ती माहिती डॉक्टरांनीच दिली असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. ज्या डॉक्टरांनी बाळासाहेबांवर उपचार केले, त्यांनीच मला हे सांगितले. मातोश्रीवरही तशी चर्चा होती असंही कदम यांनी यावेळी सांगितलं. पण ‘ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है’,असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही, असंही ठणकावलं. तसेच तुम्ही आमच्या मुळावर उठणार असाल, तर आम्ही बोलणार. अजून खूप काही असून आम्ही हळूहळू सगळं बोलणार. हे तर काहीच नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्युपत्र कोणी केलं? हे मृत्युपत्र कधी झालं? त्यात सही कोणाची होती? असा सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढण्यात यावी अशी मागणी रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून केली. आम्ही तुरुंगात गेलो. तुम्ही आम्हालाच संपवता. तुम्ही मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, रामदास कदम यांना संपवले. ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले, असाही आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात मोठी घोषणा केली. त्यांनी मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं. अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे. यात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुला-मुलींची लग्नं ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे, अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे.