
ब्राह्मणांच्या जमिनी…
गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे? असा बोचरा सवाल करणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांनी हल्ला चढवला होता. गुलामीचे गॅझेट म्हणणाऱ्या औलादींच्या घरात इंग्रज राहत होते का?
इंग्रज तुमच्या परिवारातला आहे का? लोकांच्या लेकरांना तुच्छ लेखायचे नाही. जातवान मराठ्यांनी तिच्या पक्षात कशाला काम करता? आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करायचा का? असे संतप्त सवाल करत जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला होता. आता यावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाचे नेते आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. मनोज जरांगे हे मनोरुग्ण आणि जातीवादी आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मनोज जरांगे हा मनोरुग्ण आणि पक्का पिसाटलेला जातीवादी माणूस आहे, त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले. आत्तापर्यंत तुम्ही राज्याच्या तिजोरीतून मनोज जरांगे आणि मराठा कम्युनिटीचे खूप लाड केले आहेत. जरांगे मनोरुग्ण असल्यामुळे राज्याच्या तिजोरीतून त्यांचे चांगले औषध उपचार करावेत, असे निवेदन देणार आहे, असा टोला लक्ष्मण हाकेंनी लगावला.
मनोज जरांगेंनी नॉलेज वाढवावे
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधताना काही गंभीर ऐतिहासिक प्रश्न उपस्थित केले. गांधीजींची हत्या झाली, तेव्हा ब्राह्मणांच्या जमिनी कुणी लुबाडल्या? गावागावातून त्यांना पिटाळलं कुणी? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. वतनाच्या जमिनी सध्या कुणाच्या ताब्यात आहेत, हे सर्वांनी सांगावं. मनोज जरांगेंनी नॉलेज वाढवावे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
हे सर्व निकृष्ट दर्जाचे राजकारण
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरात दगड मारू नये. याची उत्तर तुला नजीकच्या काळात मिळतील. महाराष्ट्राचे राजकारण तुमच्या हातात आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या सुद्धा तुमच्या हातात आहेत. मनोज जरांगेला माझा सांगणं आहे, आजपर्यंत जे माझ्यावरती ८-९ हल्ले झाले ते सर्व बघ. ते सर्व तुझेच चमचे आहेत. प्रसिद्धीसाठी मला गरज नाही, तुला गरज आहे. तूच हल्ले घडवून आणतोस. तूच म्हणालास 72 पैकी दोघाला मारले… आणखी 70 जणांची यादी तयार ठेवा. हे सर्व निकृष्ट दर्जाचे राजकारण आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
जातीवादामुळे महाराष्ट्राचे वाटोळे
मनोज जरांगे हा पक्का पिसाटलेला माणूस आहे. तो जातीवादी माणूस आहे. याच्या जातीवादामुळे महाराष्ट्राचे वाटोळे होतं आहे. जरांगेसारख्या प्रवृत्तीला मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जरांगे सारख्या प्रवृत्तीला मातीत गाडणार,” असेही लक्ष्मण हाके म्हणाले.