
जळगाव जिल्ह्यात राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपयश आल्याने मविआ आधीच नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. त्यातच आता अजित पवार यांनी डाव टाकत शरद पवार यांचा पक्ष खिळखिळा केला आहे.
शरद पवारांच्या गटातील अनेक मात्तबरांना अजित पवारांनी आपल्या गळाला लावल्याने शरद पवारांचा पक्ष कमजोर झाला आहे. त्यामुळे केवळ शरद पवार गटातच नव्हे तर ‘मविआ’तच कमालीची अवस्थता पसरली असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मविआ साठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. २०१७ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ३३ जागा जिंकल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने १६, शिवसेनेने १४ आणि कॉंग्रेसने ४ जागा स्वतंत्र्य निवडणूक लढवत जिंकल्या होत्या. मात्र भाजप व शिवसेने युती करुन जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले.
यावेळी जिल्ह्यातील गणित पूर्णता बदलणार आहे. कारण शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर प्रत्येकी दोन-दोन गट निर्माण झाल्याने स्पर्धा वाढणार आहे. भाजप व शिवसेना यांच्यासोबत अजित पवार यांचा एक गट वाढला आहे. त्यातच माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह दोन माजी आमदार व शेकडो पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आल्याने अजित पवारांची ताकद वाढली आहे.
परिणामी जळगावात मविआमध्ये मोठा भाऊ असलेल्या शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याने मविआ पुढील आव्हाने वाढली आहेत. त्यातच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील तीन निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्येही महायुती आणि मविआच्या घटक पक्षांमध्ये एकोपा राहण्याची शक्यता कमी दिसत आहे. महायुतीचे तीनही घटक पक्ष (भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी) स्वतंत्र लढले व मविआ मधील उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले तरी महायुतीसमोर त्यांचा टीकाव लागणे अवघड आहे.
दरम्यान युती न झाल्यास अजित पवार हे भाजप व शिवसेना शिंदे गट या दोघांना डोईजड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरुण अजित पवार यांचा गट शिंदे गटाची डोकेदुखी ठरु शकतो. कारण पूर्वी अमळनेर मतदारसंघ वगळता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्राबल्य इतर मतदारसंघात नव्हते. अनिल भाईदास पाटील हे एकमेव अजित पवार गटाचे तिथे आमदार आहेत. मात्र आता शरद पवार गटातील अनेक मात्तबर अजित पवार गटात गेल्याने अजित पवार यांचा गटही आता भाजप व शिवसेनेसोबत वाटाघाटी करण्याच्या क्षमतेचा झाला आहे.