महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांनी नुकताच विधानभवन, मुंबई येथे या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला.त्यांची निवड ही दौंडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आभार व्यक्त केले. याबाबत बोलताना ते म्हणाले, दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे आमदार अॅड कुल यांनी म्हटले . विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अॅड राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
तसेच राज्यातील सार्वजनिक उपक्रमांचे कार्य अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि जनहित केंद्रित राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक व निष्कलंक पद्धतीने समितीचे कार्य चालवले जाईल, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली.
आमदार अॅड कुल यांचे वडील दिवंगत आमदार कै. सुभाष अण्णा कुल यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याच पद्धतीने, आमदार अॅड कुल यांना मागील कालावधीत पहिल्यांदा विधानसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती.
सार्वजनिक उपक्रम समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती असून, राज्यातील विविध सरकारी कंपन्या, महामंडळे, आणि इतर सार्वजनिक संस्था यांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवण्याचे काम ही समिती करते. यामुळे या समितीच्या अध्यक्षपदावर आमदार कुल यांची निवड ही दौंडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
यावेळी राज्याचे महालेखाकार (वाणिज्यिक) श्री. दत्तप्रसाद शिरसाट, आमदार मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा अत्राम, अभिजित वंजारी, विलास भुमरे, सुलभा खोडके, विधीमंडळ सचिवालय समितीचे अवर सचिव श्री. आशिष जावळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
