मनोज जरांगे पाटलांचा इशारा; ‘चलो मुंबई’चा नारा…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टला ते मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात गोदाकाठची 123 गावं सहभागी होणार आहेत.
त्या गावांच्या ग्रामस्थांची बैठक अंबड तालुक्यातील महाकाळा येथे रविवारी झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.
जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षण देण्यासाठी ही शेवटची संधी देतोय. एक दिवस मिळून असे मागे लागतील देवेंद्र फडणीसला घर राहणार नाही. सुधरभाऊ आम्ही तुला सुधरायला संधी देतोय. मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर भयानगर परिणाम घडवून आणू.’
मनोज जरांगे म्हणाले, मुंबईला जाण्याची तयारी आत्तापासून करा. आरक्षण आपल्या हक्काचे आहे ते सोडू नका. आरक्षण हे अमृत आहे. गाफील राहू नका, आम्ही कोणाच्या बापाचे आरक्षण मागत नाही. आरक्षण देण्याची सरकारला ही शेवटची संधी आहे. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.
भुजबळ-फडणवीसांना फिरू देणार नाही
मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांच्या आडून करत आहे. ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याची व्हॅलिडिटी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना सांगून त्यामध्ये त्रुटी काढल्या जात आहेत. जर मराठा आरक्षणाला विरोध कराल तर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
समाजाशी गद्दारी करणार नाही
आमचा लढा हा गोरगरीब मराठ्यांसाठी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या विरोधात बदनामीचा कट रचला जातोय तरी मी शांत बसणार नाही. मी एकही वाईट काम केले नाही त्यामुळे मी घाबरणार नाही. जीव गेला तरी चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
