मुंबई : नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
बैठकीचे अध्यक्ष या नात्याने जोरकस भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी ”केंद्र आणि राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकदिलाने तसेच एकजुटीने काम करण्याचा” मूलमंत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. केंद्रीय सरकारचा गेल्या दहा वर्षांतील विविध राज्यांसोबतचा व्यवहार पाहता पंतप्रधानांचे हे भाषण कुणालाही विनोदी स्वरूपाचेच वाटेल आणि ते साहजिक आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे आपल्याकडे संतांनी सांगून ठेवले आहे. तथापि एखादी व्यक्ती बोलते त्याप्रमाणे वागत नसेल किंवा बोलते त्याच्या नेमके विरुद्ध वागत असेल तर त्या व्यक्तीचे काय करायचे? याचा खुलासा मात्र संतांनी केलेला नाही. उक्ती आणि कृती यामध्ये जमीन-अस्मानचे अंतर ठेवणाऱ्यांचे काय करावे, याचा फैसला संतांनी जनतेवरच सोडला असल्याने आता जनतेलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. हे सगळे एवढ्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नीती आयोगाच्या बैठकीतील भाषण, असे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकत्रितपणे काम करावे”, असे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केले. विरोधी पक्षांच्या नऊ मुख्यमंत्र्यांपैकी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, केरळचे पी. विजयन आणि कर्नाटकचे सिद्धरामय्या हे तीन मुख्यमंत्री या बैठकीला गैरहजर होते, असे त्यांनी म्हटले आहे.
