
शरद पवारांचे निकटवर्तीय पाटणकर कुटुंबीय राष्ट्रवादी सोडणार !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण (जि. सातारा) येथील नेते सत्यजितसिंह पाटणकर हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीसंदर्भात पाटणकर गटाने पाटण येथे बैठक बोलावली असून, यात ते भाजप प्रवेशासंदर्भात आपल्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
सत्यजित हे शरद पवारांचे निकटवर्तीय व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव आहेत. यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत कार्यरत असलेले आणखी एक तालेवर घराणे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात बाळासाहेब देसाई (१९५२ ते १९८३ आमदार) आणि विक्रमसिंह पाटणकर (१९८३ ते २०१४ आमदार) या दोन मातब्बर राजकीय घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ पासून पुन्हा एकदा पाटण मतदारसंघात देसाई घराण्यातील शंभूराज देसाई यांनी वर्चस्व मिळवले आहे. सध्या कॅबिनेटमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंनी सत्यजित पाटणकर यांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा पराभव केला.
शंभूराज यांचा मागील १०-१२ वर्षांतील चढता राजकीय आलेख आणि आता राष्ट्रवादीत फूट झाल्याने पाटणकर यांचे राजकीय भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळेच पाटणकर कुटुंबीयांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पाटणकर गटाची सध्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सत्ता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येत्या चार-पाच महिन्यांत होणार आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये शंभूराज देसाई हे महायुतीच्या माध्यमातून वर्चस्व मिळवू शकतात, ही भीती असल्याने पाटणकर कुटुंबीयांनी या निवडणुकीच्या पूर्वीच भाजपमध्ये जाण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.