फडणवीसांनीही मदत केली नाही…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतेमंडळींवर आरोप करण्याच्या बातम्यांमध्ये वाढ झाली आहे. सुरुवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांच्यावर आरोप झाला.
त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने या प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका महिलेने आरोप केले, या प्रकरणी त्याला नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती. मात्र, हे आरोप करण्याच्या 24 तासांच्या आतच महिलेने हे प्रकरण वाढवायचे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण शांत होते न होते तेच आता भाजपा आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांच्या दिवंगत भावाच्या पत्नीकडून आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
बुधवारी (ता. 28 मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांनी भाजपा आमदार परिणय फुके यांची भावजई प्रिया फुके (आमदार परिणय फुके यांचे लहान भाऊ दिवंगत संकेत फुके) यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. यावेळी प्रिया फुके म्हणाल्या की, मी माझा लाडक्या भावांकडे मदत मागितली, पण मला मदत मिळाली नाही. माझा सोबत कोणी उभे राहिले नाही. संकेत फुके यांच्यासोबत माझे 2012 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला होता. पण लग्नाआधी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. पण फुके कुटुंबीयांकडून याबाबत आम्हाला कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे माझी फसवणूक करून माझे त्यांच्यासोबत लग्न लावून देण्यात आले, असा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.
लग्नानंतर मला दोन मुले झाली. माझा मुलगा 10 वर्षांचा आहे आणि मुलगी 8 वर्षांची आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याला फुफ्फुसांचा संसर्ग झाला. त्यामुळे माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होते. 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी कारभार सुरू झाले. त्यामुळे मी आपण सर्व एकत्रच राहणार आहोत. मग पैशांचा कारभार कशाला असा प्रश्न मी विचारला. त्यामुळे तेव्हा ‘तू कोण आहेस?’, ‘तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे?’ असे मला विचारण्यात आले. पण मी पतीच्या पैशांविषयी बोलल्याने त्यांचा मेल इगो दुखावला गेला आणि त्यांनी (आमदार परिणय फुके) मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढले. दीड वर्षांपूर्वी मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी राहायला आहे. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, असेही मला धमकावण्यात आले, असा गंभीर आरोप प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यामातून केला आहे.
मी माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात, त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात. आताही पत्रकार परिषदेला येतान माझ्या मागे दोन माणसे होती, ती कोण होती, हे मला माहिती नाही. माझ्यावर अॅट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजी-आजोबांनी कोर्टात केस करून माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी माझा हक्क मागत आहे. मी त्यांना कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करून आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असा आरोप प्रिया फुके यांनी केला.
मी या सगळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. त्यांना संपत्तीत आमचा हक्क असल्याची कागदपत्रेही दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांना आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केला नाही. बघतो, बघतो, असे ते दरवेळी सांगत राहिले. मी त्यांना मेसेजही केले होते. मी त्यांना प्रत्यक्षात चारवेळा भेटून ही परिस्थिती सांगितली आहे. त्यांना सगळं माहिती असूनही ते काही करत नाहीत. मी महिला आयोगाकडे 2024 साली याविरोधात तक्रार केली होती. पण महिला आयोगानेही मला मदत केली नाही, असे प्रिया फुके यांनी म्हटले. मला दोन लहान मुले आहेत. पोलीस ठाण्यात मला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसवून ठेवले जाते, असाही आरोप त्यांनी केला. मला धमक्या दिल्या जातात की, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे. तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही. 20 वर्षे गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही, अशी धमकी देण्यात येत असल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.


