
गाऱ्हाने थेट अमित शांहाच्या दरबारी !
अजितदादांवर शिवसेनेचे आमदार, मंत्री नाराज असतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. पण 132 आमदार असलेल्या, मुख्यमंत्रीपद असलेल्या, केंद्रात सत्ता असलेल्या, मोदी शाहांच्या सर्वशक्तिशाली भारतीय जनता पक्षाचे आमदारसुद्धा अजितदादांमुळे त्रस्त आहेत.
त्यांनी नांदेडच्या सभेतच फडणवीस-बावनकुळेंकडे तक्रार केली. या दोघांनी तिथल्या तिथे ती अमित शाहांकडे फॉरवर्ड केली. पुढे काय झालं? अमित शाहांनी कोणता कानमंत्र दिला? नेमका काय प्रसंग घडला? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
देशाचे गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. जाता जाता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. आधी अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली. कोणी म्हणालं मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली, कोणी म्हणालं मंत्रिपदावरुन चर्चा झाली.. पण नेमकी काय चर्चा झाली ते कधीच समोर येणार नाही. त्यावरुन वेगवेगळे कयास फक्त पत्रकारच नाही तर राजकारणी सु्द्धा बांधत आहेत.
अजितदादांची तक्रार अमित शाहांकडे
मुंबईत शाहांसोबत भाऊ-दादा-भाई यांची काय चर्चा झाली याचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी नांदेडमध्ये काय झालं याची मात्र चर्चा समोर येत आहे. नांदेडच्या सभेदरम्यान भाजपच्या काही आमदारांनी अमित शाहांकडे तक्रार केली. तक्रार साधी सुधी नाही तर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांची तक्रार केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काही आमदार भेटले. अजित पवारांकडे गेल्यास कामं लवकर होत नाहीत अशी तक्रार या आमदारांनी केली. त्यावर या दोन्ही नेत्यांनी आमदारांची परीक्षा बघत थेट बिग बॉस अमित शाहांकडे चेंडू टोलवला. तक्रार करणाऱ्या आमदारांनी अमित शाहांनी सभ्य भाषेत कान उघाडणीही केली आणि कानमंत्रही दिला.
अमित शाहांचा आमदारांना कानमंत्र
भाजप आमदारांची संख्या एवढी मोठी आहे की दादाच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे असं सांगत आक्रमकपणे पाठपुरावा करा, प्रश्न मार्गी लागतील अशी आशा अमित शाहांनी भाजप आमदारांना दाखवली.
स्वत: अमित शाहांनी सांगितलं म्हटल्यावर आमदार फारच आक्रमक झाले तर ते सुद्धा परवडणार नाही. त्यामुळे महायुती म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे हे सांगायलाही अमितभाई विसरले नाहीत.
आतापर्यंत अजितदादांबद्दल फक्त शिवसेनेचे आमदार, मंत्रीच तक्रार करायचे. आता जर 132 आमदार आणि मुख्यमंत्रिपद असलेल्या, केंद्रात सरकार असलेल्या भाजपचे आमदारसुद्धा दादांची तक्रार करत असतील… आणि ती सुद्धा थेट गृहमंत्री अमित शाहांकडे तर अजितदादाची पॉवर भारी असंच म्हणायला हवं.