
मंत्री अशोक उईकेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…
लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. मात्र, सध्या या योजनेवरुन विविध चर्चा सुरु आहेत. कारण, या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
निती आयोगाच्या नियमांना पुन्हा एकदा केराची टोपली दाखवली आहे. याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखाचा निधी वर्ग करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा अदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. याच मुद्यावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नसल्याचे मत अशोक उईके यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री अशोक उईके ?
गेल्या वर्षी आदिवासी विभागाला 17 हजार 80 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तर यावर्षी त्यात 3 हजार 200 कोटींची वाढ होऊन खात्याला यावर्षी 21 हजार 500 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. त्यामुळं आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यासोबतच केंद्राकडूनही आमच्या योजनांना आर्थिक सहकार्य दिले जाते. लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना असून तिची अंमलबजावणी करणे सरकार म्हणून आमची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळं आमचा निधी कमी केला हा अपप्रचार थांबवला पाहिजे असे मत मंत्री अशोक उईके
यांनी व्यक्त केले.
नेमकं प्रकरण काय ?
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) काढण्यात आला असून, योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजा करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सुरुवातीला निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे हप्ते देऊन योजना राबविण्यात आली. राज्याच्या तिजोरीवरचा भार वाढल्यामुळे सरकारकडून नियमित हप्ते देताना आर्थिक कसरत करावी लागत आहे.