
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी जोरात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह विविध नेत्यांचे घाऊक भाजपा प्रवेश झाले. त्यामुळे विरोधी पक्षाची कोंडी झाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आले. या सरकारकडे प्रबळ बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष प्रभावहीन झाला आहे. विरोधी पक्षाला अद्यापही सूर गवसलेला नाही. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या पक्षाला नव्या दमाच्या नेत्यांची गरज भासनार आहे.
या स्थितीचा राजकीय फायदा भारतीय जनता पक्षाचे जळगावचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उचलला आहे. एरंडोल तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षासह अन्य पक्षांच्या नेत्यांचा घाऊक प्रवेश त्यांनी घडवून आणला. त्यामुळे विरोधी पक्षांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.
या नेत्यांच्या घाऊक भाजप प्रवेशाचा सर्वाधिक फटका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला आहे. राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर आणि दशरथ महाजन या तिन्ही माजी नगराध्यक्षांनी भाजप प्रवेश केला आहे. पंचायत समितीचे माजी सभापती नाना महाजन तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करीत ४० हजार मते मिळविलेल्या भगवान महाजन हे प्रमुख नेते भाजप मध्ये गेले आहेत.
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्याआधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक रुपेश माळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. भाजप आणि एकनाथ शिंदे पक्षाला प्रवेशासाठी सगळ्यांचीच पसंती आहे.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे विरोधी आघाडी विस्कळीत झाली आहे. सेना उद्धव ठाकरे पक्षाला नव्याने बांधणी करावी लागणार आहे. एरंडोल मतदारसंघात नगरपालिकेवर भाजपचा तर पंचायत समितीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गेली वीस वर्षे वर्चस्व आहे. आता बहुतांशी उद्धव ठाकरे समर्थक पक्ष सोडून गेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर असल्याने विरोधी पक्षाला अस्तित्वासाठी जगण्याची वेळ आली आहे.